रत्नागिरी : महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी अतिवृष्टी व पूरपरिस्थिती तसेच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्यांसाठी दि. ९ व १० सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे.
महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेले उमेदवार व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २० ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात आली होती. परंतु, या दिवसांत राज्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती असल्याने काही उमेदवारांना उपस्थित राहता आले नाही, अशा उमेदवारांना मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे. त्यानुसार दि. ९ व १० सप्टेंबरला गैरहजर उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे, प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये होणार आहे. याबाबतची माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:03 PM 03-Sep-2025











