चिपळूण : कोयना प्रकल्पातील चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता चालू तीन महिन्यात एकूण १९.५७ टीएमसी पाण्यावर ५३६.२६८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.
गतवर्षी १५.९० टीएमसी पाण्यावर ५०५.००३ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत ३.६७ टिएमसी पाणीवापर जादा झाला असून ३१.२६५ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.
यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला, तरी तुलनात्मक जादा पाण्याची आवक व मुबलक पाणीसाठा झाला. समाधानकारक परिस्थिती असल्याने गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३१.२६५ दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे.
पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. यावर्षी आतापर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नाही, मात्र धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पूरकाळात सोडलेल्या ८.९६ टीएमसी पाण्यावर ४१.८१३ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या १.१६ व पूरकाळातील ३.२७ अशा एकूण ५.४३ टीएमसी पाण्यावर १८.९६० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी ३.५३ टीएमसी पाणीवापर जादा झाल्याने २२.८५३ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.
कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात यावर्षी पहिल्या तीन महिन्यांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे १०.६१ टीएमसी पाण्यावर ४९४.४५५ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी १०.४७ टीएमसी वर ४८७.०४३ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे ०.१४ टीएमसी पाणीवापर जादा झाल्याने ७.४१२ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन अतिरिक्त पाणी सांडव्यावरून सोडावे लागते. पावसाचा जोर कमी झाला की दरवाजे बंद केले जातात. यावर्षी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. उपलब्ध पाण्यावर राज्याची विजेची गरज भागवण्याचा प्रयत्न केला जाईल. – राजेश रासनकर, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन मंडळ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 03-09-2025











