लघुपिंड प्रकल्पामुळे ग्रामस्थांवर ओढवलेले पाणीसंकट; कायमस्वरूपी उपायायोजनांवर होणार चर्चा
चिपळूण: चिपळूण तालुक्यातील देवखेरकी-सुतारवाडी येथील ग्रामस्थांचा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनामध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. स्थायी समिती सदस्या शिवानी सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रशासनाकडून ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
देवखेरकी येथील लघुपिंड प्रकल्पामुळे गावातील तीन विहिरी धरण क्षेत्रात गेल्यामुळे ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर पर्यायी व्यवस्था म्हणून केवळ एक विंधन विहीर (बोअरवेल) खोडण्यात आली, मात्र त्यातून आठ दिवसांतून अवघ्या दहा मिनिटेच पाणी उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांची तहान भागवणे दूरच, त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. लघुपिंड प्रकल्प उभारूनही प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना आजपर्यंत पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा झालेला नाही, ही गंभीर बाब सदस्या शिवानी सावंत यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
बैठकीत होणार ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
या विशेष बैठकीत देवखेरकी-सुतारवाडी येथील ग्रामस्थांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी कायमस्वरूपी उपायोजना करण्यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. तसेच खालील मुद्यांवर तोडगा काढण्याचे नियोजन आहे:

नवीन वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे
उर्वरित प्रकल्पग्रस्तांना भूमपादनाचा मोबदला मिळणे
पुनर्वसनाचे प्रश्न तसेच रस्ते व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे
या विशेष बैठकीस उपस्थित राहण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र काढण्यात आले असून, या बैठकीमुळे देवखेरकीच्या पाणीप्रश्नाला कायमस्वरूपी वाचा फुटेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.













