संगमेश्वर : कळंबस्ते साटलेवाडीतील विलास वसंत लोकरे पायाने दिव्यांग असून, चालण्यात खूपच अडथळे येतात. त्यांना शासनाच्या घरकुल योजनेतून घरकुल प्राप्त झाले आहे. त्यातील पहिले दोन हप्ते सुरळीतपणे प्राप्त झाले. स्वतः खातेधारक लोकरे यांच्या घरकुलाचा शेवटचा हप्ता त्यांच्या पोस्टातील खात्यात येऊनसुद्धा त्यांना पैसे मिळाले नाहीत. प्रत्येकवेळी वेगळी कारणे देऊन त्यांना पैसे देण्याचे टाळले जाते, असा त्यांचा आरोप आहे.
आतापर्यंत तब्बल पाचवेळा विलास लोकरे हे फणसवणे, कसबा, संगमेश्वर येथील पोस्टात चालता येत नसूनसुद्धा रिक्षाने स्वखचनि गेले. प्रत्येक फेरीसाठी रिक्षावाले ५०० रुपये आकारतात; पण प्रत्येकवेळी त्यांना संबंधित खात्यातून खाते लिंक नाही, इतकी कॅश नाही, लाडक्या बहिणीच्या वाटपासाठी पैसे हवेत, नेटच नाही, अशी उत्तरे देऊन पैसे देण्याचे टाळण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. स्वतःच्या हक्कासाठी दिव्यांग व्यक्तींची फरपट करून संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी काय मिळवले, असा प्रश्न सर्वजण करत आहेत. यात स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून वारंवार सरकारी कार्यालये, पोस्ट आणि बँका यात सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 05/Sep/2025












