Lanja Health Department Staff Shortage: लांजा तालुका आरोग्य विभागात १२५ मंजूर पदांपैकी तब्बल ६१ पदे रिक्त; आरोग्य यंत्रणेवर ताण

१ ग्रामीण रुग्णालय, ६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९ उपकेंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा; रुग्णांची उपचारासाठी धावपळ

लांजा : लांजा तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सध्या कमालीची ओव्हरलोड झाली आहे. तालुक्यात रुग्णसेवा पुरवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. लांजा तालुका आरोग्य विभागात मंजूर असलेल्या एकूण १२५ पदांपैकी तब्बल ६१ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध साथीच्या आजारांमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण असतो. लांजा तालुक्यात १ ग्रामीण रुग्णालय, ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे (भांबेड, जावडे, वाडीलिंबू, साटवली, शिपोशी, रिंगणे) आणि त्याअंतर्गत २९ उपकेंद्रे कार्यरत आहेत. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांअभावी आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी ताटकळत राहावे लागत आहे किंवा रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रिक्त पदांची स्थिती:

तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मंजूर पदांच्या तुलनेत निम्मी पदे रिक्त आहेत:

  • भांबेड प्रा. आ. केंद्र: २२ पैकी १३ पदे कार्यरत, ९ पदे रिक्त.
  • साटवली प्रा. आ. केंद्र: २१ मंजूर, ९ पदे रिक्त.
  • जावडे प्रा. आ. केंद्र: १९ पैकी १० कार्यरत, ९ पदे रिक्त.
  • वाडीलिंबू प्रा. आ. केंद्र: १७ पैकी ८ कार्यरत, ९ पदे रिक्त.
  • रिंगणे प्रा. आ. केंद्र: २० मंजूर, १० पदे रिक्त.
  • शिपोशी प्रा. आ. केंद्र: २१ पैकी ११ कार्यरत, १० पदे रिक्त.
  • तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय: ५ पैकी ३ कार्यरत, २ पदे रिक्त.

विविध संवर्गातील प्रमुख रिक्त पदे:

  • तालुका आरोग्य अधिकारी: १ पद रिक्त.
  • आरोग्य सहाय्यक (स्त्री): १ पद रिक्त.
  • आरोग्य सेवक (पुरुष): भांबेड १, साटवली १, जावडे २, वाडीलिंबू २ अशी एकूण ६ पदे रिक्त.
  • आरोग्य सेविका (नियमित): भांबेड ३, साटवली ५, जावडे २, वाडीलिंबू २, रिंगणे ३, शिपोशी ४ अशी एकूण १९ पदे रिक्त.
  • वाहन चालक (नियमित): भांबेड १, साटवली १, जावडे १, वाडीलिंबू १, रिंगणे १, शिपोशी १, तालुका कार्यालय १ अशी एकूण ६ पदे रिक्त.
  • परिचर विभाग: भांबेड २, साटवली ३, जावडे ३, वाडीलिंबू ३, रिंगणे ३, शिपोशी ३, तालुका कार्यालय १ अशी एकूण १८ पदे रिक्त.
  • स्त्री परिचर: भांबेड १, साटवली १, जावडे १, रिंगणे १, शिपोशी १ अशी एकूण ५ पदे रिक्त.
  • सफाई कामगार: ५ पदे रिक्त.
  • आरोग्य सेवक (पुरुष – उपकेंद्र): २८ उपकेंद्रांपैकी शिपोशी, पालू, वाकेड, व्हेळ येथे प्रत्येकी १ असे ४ पदे रिक्त.

प्रशासनाने तत्काळ रिक्त पदे भरण्याची मागणी:

तालुक्यात अपघात विभाग, बालरोगतज्ज्ञ, सर्प-विंचू दंश उपचार सेवा, आयसीयू रुग्णवाहिका आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकदा रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लांजा तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी आग्रही मागणी तालुक्यातील सुजाण नागरिकांमधून केली जात आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:32 06-08-2026