Ratnagiri ZP School Uniform Fund Delay: जि. प. च्या ६०,४७६ चिमुकल्यांचा गणवेश कागदावरच! पहिल्या गणवेशाचे ३०० ऐवजी दिले २४० रुपये

स्वातंत्र्यदिन तोंडावर आला तरी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा दुसरा गणवेश आणि बूट-सॉक्सचा निधी प्रलंबित; शिक्षकांची मोठी कसरत

रत्नागिरी: जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि मूलभूत सुविधांबाबत प्रशासकीय उदासीनता समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन दीड ते पावणेदोन महिने उलटून गेले आहेत आणि १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र, अद्याप रत्नागिरी जिल्ह्यातील ६०,४७६ पात्र विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाचा निधी मिळालेला नाही. एवढेच नाही तर बूट आणि सॉक्सअभावी ही बालके आजही चिखल, दगड आणि काट्याकुट्यांचा रस्ता अनवाणी पायांनी तुडवत शाळा गाठत आहेत.

शासनाच्या आदेशानुसार १५ जून रोजी शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक मोफत गणवेश मिळणे गरजेचे होते. परंतु प्रत्यक्ष निधी वाटपाच्या वेळी शासनाने आपल्याच धोरणाला हरताळ फासला आहे. पहिल्या गणवेशासाठी ३०० रुपयांची रक्कम आजच्या महागाईच्या काळात अत्यंत तुटपुंजी असताना, त्यातही कट लावून पालकांच्या व शिक्षकांच्या हातात केवळ २४० रुपये टेकवण्यात आले आहेत. उर्वरित ६० रुपयांच्या रक्कमेसाठी सीएसआर (CSR) निधी किंवा लोकवर्गणी जमा करण्याचा अजब सल्ला प्रशासनाकडून दिला गेल्याने गणवेश पुरवताना शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

तालुकानिहाय गणवेशाच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी:

  • मंडणगड: २,९०४
  • दापोली: ६,४६३
  • खेड: ६,०९०
  • चिपळूण: ७,८३४
  • गुहागर: ५,६४८
  • संगमेश्वर: ७,९१३
  • रत्नागिरी: १२,१६६
  • लांजा: ५,०७९
  • राजापूर: ७,०७९
  • एकूण विद्यार्थी संख्या: ६०,४७६

शिक्षणाचा हक्क आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत शासन सातत्याने मोठ्या बाता मारत असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीतील बेफिकिरी रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बूट आणि सॉक्ससाठी मंजूर असलेले प्रतिविद्यार्थी १७० रुपयेही अद्याप प्राप्त झालेले नाहीत. परिणामी ऐन पावसाळ्यात कोकणातील विद्यार्थ्यांना तुटलेल्या चपला घालून किंवा अनवाणी पायांनी शाळेत जावे लागत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पालक आणि शिक्षक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 06-08-2026