शासकीय पडीक जमिनींचे सुशोभीकरण, सौर ऊर्जा, वाचनालय, क्रीडांगण आणि दिवाबत्तीसाठी मिळणार विशेष निधी
रत्नागिरी: गावांच्या वाढत्या विकास गरजा आणि आधुनिक सुविधांची उपलब्धता लक्षात घेऊन राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी पाच अत्यंत महत्त्वाच्या नव्या योजनांना मंजुरी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (District Annual Plan) या योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, या माध्यमातून ग्रामपंचायतींना आपल्या कार्यक्षेत्रात विविध विकासकामांसाठी तब्बल ९० लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या जिल्हा वार्षिक योजनेत ‘ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान’ या घटकातून विकासकामांसाठी निधी दिला जात होता. मात्र, या योजनेचे निकष सन २०१० मध्ये निश्चित करण्यात आले होते. गेल्या १४-१५ वर्षांत ग्रामपंचायतींच्या कामांची व्याप्ती आणि ग्रामस्थांच्या गरजा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नवीन सुविधांसाठी स्वतंत्र निधीची मागणी केली जात होती. या मागण्यांची दखल घेत शासनाने या पाच नव्या योजनांना हिरवा कंदील दाखवला आहे.
५ नव्या योजना आणि निधीची मर्यादा:
- शासकीय पडीक जागांचे सुशोभीकरण: गावाच्या हद्दीतील शासकीय पडीक जमिनींचा वापर करून त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये.
- सौर ऊर्जा प्रणाली (Solar Power System): शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी २० लाख रुपये.
- अभ्यासिका व वाचनालय इमारत: गावातील विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वाचनालय (Library) इमारतीसाठी २० लाख रुपये.
- क्रीडांगण विकास: गावातील खेळाडूंसाठी क्रीडांगणाचा (Playground) विकास करण्यासाठी २० लाख रुपये.
- सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्था: गावातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी प्रकाश व्यवस्थेसाठी १५ लाख रुपये.
दुहेरी निधी वापरास सक्त बंदी:
ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, या पाच योजनांअंतर्गत मंजूर झालेल्या कामांसाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून किंवा फंडातून पुन्हा निधी घेता येणार नाही. एकाच कामासाठी दुहेरी निधीचा (Double Funding) वापर होऊ नये आणि निधीचा पारदर्शक वापर व्हावा, यासाठी ही विशेष अट घालण्यात आली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:06 06-08-2026














