वनविभागाकडे नुकसानभरपाईची मागणी
संगमेश्वर:संगमेश्वर तालुक्यातील किरबेट परिसरात वन्यजीवांचा उपद्रव वाढला असून, सलग दोन गवारेड्यांनी (Bisons) सुमारे १४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान केले आहे. रोप लावणी पूर्ण झालेली भातशेती गवारेड्यांनी खाऊन आणि पायांखाली तुडवून फस्त केल्याने स्थानिक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा भातलावणीच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिल्याने किरबेट येथील शेतकऱ्यांना पंपाच्या साहाय्याने पाणी देऊन अत्यंत कष्टाने भातशेतीची लावणी करावी लागली होती. मात्र, आता हाताशी आलेले पीक गवारेड्यांनी नष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या घटनेत खालील १४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे:
- बाधित शेतकरी: राजेंद्र जायगडे, सदानंद चाळके, पांडुरंग जायगडे, अनंत पांचाळ, शरद कांबळे, आत्माराम कांबळे, अशोक कांबळे, सुनील अंकुशराव, संजय जायगडे, संजय कांबळे, प्रकाश जायगडे, महेश जायगडे, प्रकाश सुर्वे आणि महेंद्र लाखन.
एकीकडे वन्यजीवांच्या त्रासाने शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे कृषी विभागाचे कर्मचारी अधूनमधून गावात येतात, मात्र ते नुकसानीची पाहणी करत नाहीत किंवा शेतीविषयक समाधानकारक सल्ला देत नाहीत, असा आरोप करत शेतकऱ्यांनी कृषी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वनविभागाने या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या गवारेड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, बाधित भातशेतीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी किरबेट येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:09 06-08-2026














