साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावातील चिंचवलकरवाडी स्थानिक, मुंबई ग्रामस्थ आणि महिला यांच्या संयुक्त बैठकीत लग्नातील काही अनिष्ट व खर्चिक प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात दारू देण्याची प्रथाही बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे तर यजमानाने आणून दिल्यास त्यांच्या लग्नकार्यात सहभागी न होण्याचेही एकमताने ठरविण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष दयानंद चिंचवलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही संयुक्त बैठक झाली. यावेळी गावचे डॉ. शशिकांत चिंचवलकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता चिंचवलकर व सोमलिंग स्पोर्ट्स सचिव गौरव चिंचवलकर आदींसह ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. आजच्या महागाईच्या काळात लग्नसराईत खर्चाचा जास्त ताण पडू नये म्हणून काही निर्णय घेण्यात आले.
चिंचवलकर वाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थ आत्माराम चिंचवलकर, सुरेश चिंचवलकर,विजय चिंचवलकर, बाळकृष्ण जाधव, सुरेश तळेकर, कांशीराम माईल, शांताराम नलावडे, ग्रामस्थ व महिला यांच्या संमतीने हे निर्णय घेण्यात आले. तरुण पिढीला योग्य दिशा मिळण्यासाठी या जुन्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय वाडीने घेतला आहे.
हे आहेत लग्नाबाबतचे नवे नियम
1लग्नाचा बस्ता घेण्यासाठी फक्त कुटुंबातील व्यक्ती आणि वाडीतील एक किंवा दोनच व्यक्ती जातील.
2घरबघणी कार्यक्रमात जेवण ठेवले जाते, 3 तोही अनावश्यक खर्च असल्याने घरबघणी प्रथाच बंद करण्यात आली आहे.
3लग्नाच्या आदल्या दिवशी आगरी हळद 5 केली जाते. यावेळी दारूसह मांसाहारी पार्टी ठेवली जाते, ती प्रथा बंद करण्याचे ठरले.
4मुंबईत जर लग्न असेल तर आगरी हळदीला फक्त शेजारी, मित्रमंडळी यांनाच बोलवायचे, वाडीतील ग्रामस्थांना नाही.
5हळद उतरवणीच्या कार्यक्रमातही दारू दिली जाते. लग्नघरातील यजमानाने दारू आणू नये. आणल्यास त्यांच्या घरातील लग्नकार्यात कोणीही सहभागी होऊ नये.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:41 PM 06-Sep-2025












