नारळाचे शाश्वत उत्पादन अर्थक्रांती घडवू शकेल : डॉ. किरण मालशे

रत्नागिरी : नारळाचे शाश्वत उत्पादन हे व्यवसाय भूमिकेतून घेतले पाहिजे. तसेच प्रक्रिया उद्योग निर्माण झाले पाहिजेत. शाश्वत नारळ उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगातून अर्थक्रांती घडू शकते, असे प्रतिपादन रत्नागिरीतील भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषिविद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांनी केले. त्यांनी नारळपिकाची सद्यःस्थिती, सुरू असलेले संशोधन, नवीन शिफारशी यांबाबत माहिती दिली.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात जागतिक नारळ दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुधारित नारळजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी लांजा येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद हणमंते, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, राजापूर तालुका कृषी अधिकारी सपकाळ, पावसचे मंडळ कृषीअधिकारी मासाळ, नारळ उद्योजक तुषार आग्रे, डॉ. संतोष वानखेडे उपस्थित होते.

तांत्रिक सत्रामध्ये नारळदिनाचे महत्त्व, नारळ पिकासंदर्भात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. नारळ प्रक्रिया उद्योगाला असणारा वाव तसेच रोजगार निर्मिती, नारळ क्षेत्रविस्ताराला असलेला वाव आणि प्रक्रिया उद्योग, नारळाचे आहारातील महत्त्व यांसह नारळ लागवड व पीकसंरक्षणाबाबत माहिती देण्यात आली.

याप्रसंगी शेतकऱ्यांनीही आपले अनुभव कथन केले. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी केंद्रावरील संतोष पाटील, गोपाळ विसपुते तसेच कर्मचारी, मजूर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी तसेच सातारा जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

Shiva optical

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:01 PM 06-Sep-2025