रत्नागिरी : गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास चांगला, सुखकर व्हावा म्हणून रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या. परतीच्या प्रवासासाठी २ हजार १३९ एसटी बसेसचे आरक्षण झाले होते. दि. २ ते ७ सप्टेंबरच्या काळात टप्प्या टप्प्याने एसटी बसेस सोडण्यात आल्या. शेवटच्या दिवशी तब्बल ५६ एसटी बसेस मुंबईला रवाना झाल्या. चांगल्या सुविधा, नियोजनामुळे चाकरमान्यांचा मुंबई, पुण्याचा प्रवास सुखकर, चांगला झाला. परतीच्या प्रवासाठी जादा गाड्या सोडणाऱ्या रत्नागिरी विभागास लाडका बाप्पा पावणार असून कोट्यवधीची उत्पन्न विभागास होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवासाठी प्रत्येक कोकणकर आपल्या मुळगावी जात असल्यामुळे एसटी महामंडळाच्या वतीने गणेशोत्सवासाठी ५ हजार २०० एसटी बसेस कोकणात सोडल्या होत्या. त्यापैकी २९३० एसटी बसेस रत्नागिरी जिल्ह्यात आल्या होत्या.
रत्नागिरी विभागाच्या एकूण २०० एसटी बसेस मुंबईला गेल्या होत्या. गणेशोत्सवात दहा दिवसांत चाकरमान्यांनी गणेशोत्सवाचा सण आनंदात साजरा केला. गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर खऱ्या अर्थाने चाकरमान्याना मुंबईसह अन्य शहरात जाण्यासाठी वेध लागले होते. चाकरमान्यांचा प्रवास चांगला होण्यासाठी रत्नागिरी विभागाने २ हजार ५०० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २,१३९ एसटी बसेसचे आरक्षण झाले होते. २ ते ७सप्टेंबरच्या कालावधीत या एसटी बसेस रत्नागिरी जिल्ह्यातील त्या-त्या आगारातून मुंबईत पोहोचल्या आहेत. मुंबईकरांचा परतीचा प्रवास आनंदमयी होण्यासाठी रत्नागिरी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्यामुळे, चोख नियोजन केल्यामुळेच सर्व कोकणवासीयांचा मुंबईचा प्रवास सुखकर झाला. तसेच काहीजणांनी रेल्वे, खासगी बसेस, चारचाकीचा आधार घेवून मुंबईचा प्रवास केला.
कोकण झाले सामसूम
गणेशोत्सवानिमित्त लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळ गावी परतले होते. त्यामुळे वर्षभर बंद असलेली दारे उघडली. १० दिवसात लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा केली. सर्व कुटूंब एकत्रित आले होते. गणेशोत्सवानंतर आता चाकरमानी मुंबईला परतू लागले असून ६ तारखेपर्यंत कित्येक प्रवासी मुंबईला पोहोचले तर रविवारी शेवटची एसटी मुंबईला रवाना झाली. दहा दिवसांत गजबजलेले कोकण आता सामसूम झाले आहे. परतीचा प्रवास करताना चाकरमान्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांतून अश्रू दिसून आले.
रत्नागिरी विभागातून परतीच्या प्रवासासाठी २ हजार १३९ एसटी बसेसचे बुकिंग झाले होते. सर्वच एसटी बसेस मुंबईत पोहोचल्या आहेत. कोकणवासीयांचा प्रवास चांगला होण्यासाठी एसटी विभागाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 08/Sep/2025












