पावस : मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत दहा दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात अनंत चतुर्दशी दिवशी पावस दशक्रोशीत श्रीगणेश भक्तगणांनी निरोप दिला.
कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट आहे. एरवी भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेतात पण चतुर्थीला मात्र श्रीगणेशाची घरोघरी भाविक प्राणप्रतिष्ठापना करतात. दहा दिवसांच्या गणरायाची ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक गावखडी येथे काढण्यात आली. पाऊस नसल्यामुळे गणेश विसर्जनाला अडचण आली नाही. गावखडी समुद्रकिनाऱ्यावर गणराया आम्हाला चांगले आरोग्य लाभो, सुखी ठेव तसेच आमची भातशेती चांगली होऊ दे, पीक आमच्या हाती मिळू दे, असे साकडे लाडक्या गणरायाला भक्तांनी घातले.
पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३७०० गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. त्यात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस व वामन द्वादशी या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अखेरच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी या परिसरामध्ये ७४० गणेशमूर्तींचे मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 08-09-2025












