Mukhyamantri Samruddha Panchayatraj Abhiyan : रत्नागिरी जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायती होणार ‘कचरामुक्त’

रत्नागिरी : ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान आहे. ती अधिक बळकट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन ग्रामपंचायतीस लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी प्राप्त करून द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केली आहे. १७ सप्टेंबरपासून हे अभियान सुरु होणार असून पहिल्या दिवशी ८४७ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर किमान २०० ग्रामपंचायती कचरामुक्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदने घेतला आहे.

ग्राम विकास विभागाच्यावतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांना कामगिरीनुसार प्रोसाहित करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनाचा समाजातील सर्व घटकांना लाभ देऊन ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे, ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ उभा करणे ग्रामीण नागरिकांना सुलभरीतीने सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर साधू संत परंपरेचा सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर अशा चार स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे पुरस्कार अभियान सुरू केले आहे.

या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर राहणार आहे. गावाचे मूल्यमापन करण्यासाठी तालुका, जिल्हा विभाग व राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीस स्वयंमूल्यांकनाद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० जानेवारी असणार आहे.

तालुकास्तरावरील मूल्यमापन ११ जानेवारी ते २६ जानेवारी, जिल्हा स्तरीय मूल्यमापन २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी, विभागस्तरीय मूल्यमापन १७ फेब्रुवारी ते २७फेब्रुवारी तर राज्यस्तरीय मूल्यमापन संपूर्ण मार्च महिन्यादरम्यान होणार आहे.

जिल्ह्यात या अभियानाला १७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये २०० ग्रामपंचायती कचरामुक्त करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर पहिल्या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभा तहकुब होऊ नये, यासाठी विशेष काळजी प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.

मुख्य घटक विषय
सुशासन युक्त प्रशासन १६ गुण, सक्षम पंचायत १० गुण, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव १९ गुण, मनरेगा व इतर योजनाशी अभिसरण ६ गुण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण १६ गुण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय २३, लोक सहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे ५ गुण, तर नावीन्यपूर्ण उपक्रम ५ गुण असे एकत्रित १०० गुणांचे हे मूल्यमापन असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 PM 13/Sep/2025