भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र नंबर 1!

मुंबई : ठाणे महानगरपालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे याच्यावरील कारवाईने खळबळ उडाली असताना देशभरातील भ्रष्टाचार विरोधी कारवायांमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचे उघड झाले आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२३ च्या अहवालानुसार, देशभरात एकूण २८७५ सापळे रचण्यात आले, यापैकी सर्वाधिक ७९५ कारवाया महाराष्ट्रात करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशातील कारवाईपैकी २८ टक्के सापळे हे महाराष्ट्रातच रचण्यात आले आहे. यंदा २ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ५३० सापळा कारवाया करण्यात आल्या. त्यात ७८५ शासकीय कर्मचारी आणि खासगी व्यक्तींना अटक केली.

महाराष्ट्रानंतर राजस्थान (२८४) दुसऱ्या, कर्नाटक(२४५) तिसऱ्या, तर गुजरात(१८३) चौथ्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीकडे राज्यातील अनेक माजी व सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत.

नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगरात सर्वाधिक सापळे
राज्यातील नागरिकांची भ्रष्टाचाराविरुद्धची भूमिका आणि पोलिस यंत्रणेवरील विश्वास अधोरेखित करते. लाचखोरी सामान्य झालेली नसून, नागरिक निर्भीडपणे तक्रारी दाखल करतात, ही बाब स्वागतार्ह असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाया नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर येथे करण्यात आल्या, तर सर्वांत कमी कारवाया मुंबईत नोंद आहेत.

सहा राज्यांमध्ये शून्य लाचखाेरी
ईशान्य भारतातील आठ राज्यांपैकी आसाम, सिक्कीम सोडल्यास अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि नागालँड या सहा राज्यांत एकही सापळा कारवाई झालेली नाही. आसाममध्ये ९१, तर सिक्कीममध्ये अवघी एक कारवाई झाल्याचे या अहवालात नमूद आहे. दुसरीकडे पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि गोवा या तुलनेने मोठ्या राज्यांमध्येही सापळा कारवाई शून्य आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 09-10-2025