Ratnagiri : उबाठाकडून भास्कर जाधव, राजन साळवी, बाळ माने यांना उमेदवारी

मुंबई : महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपल्या ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली. उमेदवारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात भास्कर जाधव (गुहागर), राजन साळवी (राजापूर), सुरेंद्रनाथ (बाळ) माने (रत्नागिरी) यांना तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभव नाईक (कुडाळ), राजन तेली (सावंतवाडी) यांचा समावेश आहे.

ठाकरे यांच्या पहिल्या यादीत विद्यमान १४ आमदारांबरोबरच माजी आमदारांनाही पुन्हा संधी दिली आहे. तर नुकतेच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या इच्छुकांनाही उमेदवारीची लॉटरी लागली आहे. उमेदवारीच्या पहिल्या यादीत आदीत्य ठाकरे (वरळी) यांच्याबरोबरच माजी खासदार राजन विचारे (ठाणे), महेश सावंत (माहिम) आणि वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (कोपरी-पाचपाखाडी) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असताना ठाकरे गटाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली. या यादीत एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे यांची साथ देणाऱ्या निष्ठावान १५ पैकी १४ आमदारांवर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. यामध्ये मुंबईतील सहा आमदारांचा समावेश आहे. विद्यमान आमदारांमध्ये सुनील राऊत (विक्रोळी), रमेश कोरगांवकर (भांडूप पश्चिम), सुनील प्रभू (दिंडोशी), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), संजय पोतनीस (कलीना), आदित्य ठाकरे (वरळी), यांच्याबरोबरच नितीन देशमुख (बाळापूर), कैलास पाटील (धाराशिव), राहुल पाटील (परभणी), उदयसिंग राजपूत (कन्नड) यांचा समावेश आहे. दरम्यान, नेवासामधून माजी मंत्री शंकरराव गडाख यांना नेवासामधून उमेदवारी देण्यात आली आहे.

निवडणूकीच्या तोंडावर पक्षप्रवेश केलेल्या इच्छुकांवरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये सुरेश बनकर (सिल्लोड), दिपक साळुंखे (सांगोला), राजन तेली (सावंतवाडी), उन्मेश पाटील (चाळीसगाव), सुरेंद्रनाथ (बाळ) माने (रत्नागिरी), के.पी. पाटील राधानगरी) आदींचा समावेश आहे.

Ratnagiri Khabardar add image

अजय चौधरींचा पत्ता कट?
ठाकरे गटाने बुधवारी जाहिर केलेल्या यादीमध्ये विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली असली तर यामध्ये विधानसभेतील गटनेते आणि शिवडी मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांचा समावेशच केलेला नाही. शिवडी मतदारसंघात अजय चौधरी यांच्याबरोबरच लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी हे सुद्धा इच्छुक आहेत. साळवी यांनीही आपल्याला उमेदवारी मिळण्याबाबत पक्षप्रमुखांकडे आग्रह धरला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच मातोश्रीवर या दोघांना बोलावून चर्चा केली होती. मात्र, आज जाहिर केलेल्या यादीत शिवडी मतदारसंघाचा समावेश नसल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

मतदारसंघनिहाय अन्य उमेदवार
महादेव घाटळ (भिवडी ग्रामणी), राजेश वानखेडे (अंबरनाथ), दिपेश म्हात्रे (डोंबिवली), सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), नरेश मणेरा (ओवळा माजिवडा), एम. के. मढवी (ऐरोली), उदेश पाटेकर (मागाठाणे), अनंत (बाळा) नर (जोगेश्वरी पूर्व), समीर देसाई (गोरेगाव), प्रवीणा मोरजकर (कुर्ला), नितीन सावंत (कर्जत), मनोहर भोईर (उरण), स्नेहल जगताप (महाड), वैशाली सुर्यवंशी (पाचोरा), सिद्धार्थ खरात (मेहकर), गोपाल दातकर (अकोला पूर्व), डॉ. सिद्धर्थ देवळे (वाशिम), सुनील बरबटे (रामटेक), संजय दरेकर (वणी), एकनाथ पवार (लोहा), डॉ. संतोष टारफे (कळमनुरी), विशाल कदम (गंगाखेड), किशनचंद तनवाणी (संभाजीनगर मध्य), राजू शिंदे (संभाजीनगर पश्चिम), दिनेश परदेशी (वैजापूर), गणेश धात्रक (नांदगांव), अद्वय हिरे (मालेगांव बाह्य), अनिल कदम (निफाड), वसंत गिते (नाशिक मध्य), सुधाकर बडगुजर (नाशिक पश्चिम), जयेंद्र दुबळा (पालघर), डॉ. विश्वास वळवी (बोईसर), बदामराव पंडीत (गेवराई), राहुल पाटील (परांडा), दिलीप सोपल (बार्शी), अमर पाटील (सोलापूर दक्षिण), हर्षद कदम (पाटण), संजय कदम (दापोली), सत्यजीत पाटील, आबा (शाहूवाडी).

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 24/Oct/2024