यंदा अवकाळी पावसामुळे भातपीक घटणार!

रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात पिकांना मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला असून, शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेला पाऊस त्यानंतरही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे जिल्ह्यातील भात पिके पाण्यात गेली आहेत. तयार झालेले भात पीक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला असून, खरीप पीक पूर्ण वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांकडून भिजलेले पीक वाचवण्यासाठी धावपळ सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार महिन्यांत मान्सुनी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे भात पिके चांगल्या पद्धतीने आली होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस, त्यानंतर वादळामुळे सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे ऐन बहरात आलेली पिके भिजली, भात पिके आडवी झाली. कापणी केलेली पिके भिजून गेली. त्यामुळे जिल्ह्यातील १७० गावांतील १ हजार ९८ शेतकऱ्यांचे १७४ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ऑक्टोबर महिन्यातील २७ दिवसांत झाले आहे. तब्बल १६ लाखांहून अधिक पिकांचे नुकसान झाले.

दरम्यान, सध्या मोथा या चक्रीवादळाच्या प्रभावाने जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यानंतर शनिवारी पहाटेपासून पावसाचा पुन्हा जोर वाढला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी तालुका, गुहागर, दापोली, चिपळूण, मंडणगड, खेड या तालुक्यातील पिकांना तडाखा गेला आहे. दिवस-रात्र पावसामुळे कापणी केलेल्या शेतात पाणीच पाणी होते. त्यातच मोथा प्रभाव अजून काही दिवस जाणवणार असल्यामुळे पाऊसही पडत आहे. कापलेले पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न दिसून आले.

रब्बी पेरण्या लांबणीवर जाणार
रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप भात पिकांची झोडणी, मळणी झालेली नाही. सततच्या पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्याचे चित्र आहे. रब्बी पेरणीस विलंब होण्याची शक्यता आहे.

परतीच्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. विविध शेतांतील भात पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. १ ते २७ऑक्टोबरदरम्यान १७४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 03/Nov/2025