शालेय संस्कृतीवरच विद्यार्थी विकास अवलंबून : मानसी गानू

माखजन : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शालेय संस्कृती व शालेय प्रक्रिया याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. शालेय संस्कृतीवरच विद्यार्थी विकास अवलंबून असल्याचे मत मानसी गानू यांनी मांडले. सावर्डे येथे डाएट रत्नागिरीतर्फे सुरू असलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणादरम्यान ‘शालेय संस्कृती व शालेय प्रक्रिया’ या विषयावर त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, शालेय संस्कृती ही अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत लक्षणीय व प्रत्यक्ष भूमिका बजावते. प्रभावी शालेय संस्कृतीमुळे उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण होते. अशा वातावरणात विद्यार्थी उत्साहाने, सक्रियपणे व लक्षपूर्वक शिकण्यासाठी प्रवृत्त होतो. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल व चिकित्सक वृत्ती निर्माण होते. खरेतर शालेय संस्कृतीचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर सकारात्मक परिणाम होणे हे अभ्यासक्रमाचे महत्वाचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

शालेय संस्कृतीच्या सक्षम वातावरणासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अनेक पैलू सांगण्यात आले आहेत. यावर सौ. गानू यांनी माहिती देत प्रत्येक शिक्षकाने या पैलूंचा सूक्ष्मपणे अभ्यास करून आपआपल्या शाळेत आदर्श शालेय संस्कृतीच्या निर्माणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांचा क्रियात्मक, बोधात्मक आणि भावनात्मक विकास होण्याच्या हेतूने आवश्यक असलेल्या विविध उपक्रम व अंमलबजावणीसाठी असणाऱ्या व्यवस्थेची संघटित प्रक्रिया असल्याचे नमूद केले.

या प्रशिक्षणात प्रा. प्रभात कोकजे, सुधीर शिंदे, मानसी गानू आदी सुलभक म्हणून काम पाहत आहेत, तर डाएटच्या प्राचार्या नीता कांबळे, राहुल बर्वे, अधिव्याख्याते राजेंद्र लढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 04/Nov/2025