दहा वर्षांत जातीयवादाचा अतिरेक; मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांची खंत

रत्नागिरी : मागील दहा वर्षांत देशात जातीयवाद वाढत आहे. मुस्लिम लोकांना जय श्रीराम म्हणण्यासाठी बळजबरी करण्यात येत असून हे चुकीचे आहे. देशात मनुष्यापेक्षा प्राण्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. एकीकडे काहीजण घटनेचा उदो उदो करतात, तत्त्वाचा विचार करायला हवा, मोठे पोस्टर लावतात, बाबासाहेबांचा फोटो असतो. मात्र खाली हिंदू राष्ट्र असे लिहितात. भारत हिंदू राष्ट्र झाल्यास ती महान आपत्ती असेल असेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. घटनेतील तत्वे आचरणात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी केले.

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधान जागर विचार मंचच्या वतीने रविवारी रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृहात आयोजित राष्ट्रीय संविधान परिषदेत ते भारतीय संविधानातील सामाजिक न्याय विषयावर बोलत होते.

ठिपसे पुढे म्हणाले, भारत हे धर्मनिरपेक्ष देश आहे. तरीही घटनेविरूध्द वागणे, बोलणे सुरूच आहे. आजच्या लोकांना घटना कळली पाहिजे, विषमता वाढत चालली आहे. संविधानातील कायदे, तरतुदीनुसार देश चालणे गरजेचे आहे.

त्यामुळे संविधानातील मूल्ये, तत्वे आणि आदर्श यांचा जागर करून त्यांना सर्वसामान्यांच्या जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. असे कार्यक्रम राज्यभरात होणे गरजेचे आहे. केवळ दलितांवरच नाही तर स्त्रियांवरही अन्याय झाला आहे. आजच्या काळात महिला शिकत आहेत, नोकरी करीत आहेत. काही कार्यालयात महिलांकडे एकटक बघणे, तसेच विविधप्रकारे महिलांचे लैंगिक शोषण होत आहे. मात्र बायका तक्रार करत नव्हत्या, आता महिला शोषणाविरूध्द तक्रार करण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे कारवाई होत आहे. अॅट्रासिटी कायद्यामुळे कित्येकांना न्यायही मिळाला आहे.

प्रसिध्द अर्थतज्ज्ञ व माजी खासदार नरेंद्र जाधव म्हणाले, संविधान निर्मितीसाठी तब्बल १२ वेळा प्रयत्न झाले. ८ वेळा प्रयत्नात प्रत्यक्षात बाबासाहेबांचा सहभाग होता. यावेळी प्रा. दत्तात्रय कांबळे, रामा सरतापे, दिवाकर करवंदे, डॉ. शाह मधाळे, डॉ. अंबादास रोडगे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. गुलाबराज राजे यांना सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देवून राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार देण्यात आला. आभार शिवाजी उकरंडे यांनी मानले. कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके, संविधान, तसेच इतर पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी रत्नागिरीकरांनी पुस्तके खरेदी केली.

संविधान दिंडीने वेधले लक्ष
राष्ट्रीय संविधान परिषदेच्या कार्यक्रमात सुरूवातीला संबिधान दिंडी काढण्यात आली. या दिंडीत संविधानची प्रत ठेवण्यात आली होती. यावेळी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी संविधान वाचवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून दिंडीस सुरूवात झाली. जिल्हारुग्णालय, जिल्हा परिषद, माळ नाका, मारूती मंदिर मार्गे सावरकर नाट्यगृहात दिंडीचा समारोप झाला.

राष्ट्रीय संविधान परिषदेत प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुचिता गायकवाड यांनी भारतीय संविधान व महिला सबलीकरण, दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी तळागाळापर्यंत खरोखरंच संविधान पोहोचलेय का, तर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी संविधान काल, आज आणि उद्या विषयावर व्याख्यान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक सादर करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 08/Dec/2025