लांजा : इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार

Jun 15, 2024 - 10:52
 0
लांजा : इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार

लांजा : तालुक्यातील दरडग्रस्त आणि प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना महसूल प्रशासनाकडून स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तालुक्यातील १८० कुटुंबांना सतर्कतेच्या आणि स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत; मात्र इंदवटी बाईतवादी येथील दोन कुटुंबांची तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी भेट घेऊन या लोकांचों मनधरणी केल्यानंतरही राहती जागा सोडण्यास व स्थलांतरास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

इंदवटी बाईतवाडी येथील २० घरांचे व २५ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे मात्र इंदवटी बाईतवाडी येथील दोन कुटुंबीयांनी स्थलांतरास नकार दिला आहे. महसूल प्रशासनाकडून तहसीलदार प्रमोद कदम आणि प्रांताधिकारी वैशाली माने यांनी या ग्रामस्थांची भेट घेतली. 

बाईंतवाड़ी या ठिकाणी वरच्या भागात मोठा दगड असून, खालील बाजूला दोन घरे आहेत. अशा परिस्थितीत भूस्खलन झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच तुम्ही जागा सांगा, आम्ही त्या जागेवर तुमचे पुनर्वसन करतो, असे देखील तेथील ग्रामस्थांना सांगितले आहे; मात्र आमची ही पूर्वापार जागा आहे. आमची देवाची जागा आहे आणि ही जागा सोडणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरडग्रस्त व भूस्खलन भागातील कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन पुढाकार व प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनीच राहती जागा सोडून जाण्यास नकार दिला आहे.

दरडग्रस्त गावांचे सर्वेक्षण
तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे भूगर्भ शास्त्रज्ञांतर्फे सर्वेक्षण करून गावे निश्चित करण्यात आली आहेत. अतिवृष्टी जोखीम भागात खोरनिनको साईनगर मुसळेवाडी येथील २५ घरे, वनगुळे ५ घरे, इंदवटी ९ घरे, खावडी भोवडवाडी १५ घरे, गोळवशी तेलीवाडी २० घरे, साटवली तालयेवाडी, भांडारवाडी ३४, भांबेड दत्तमंदिर १, वेरवली पाथरेवाडी ११, कुरंग १३, निवसर मुस्लिमवाडी ४०, इंदवटी बाईतवाडी २, गांगरकर कोकण रेल्वे बोगद्याशेजारी ५, कोल्हेवाडी १ या ठिकाणी या कुटुंबांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खोरनिनको येथे धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. दरडग्रस्त गावांत पालक, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 15/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow