चिपळूण : शिरगाव उपनदी पात्रावर अतिक्रमण

Jun 17, 2024 - 12:38
Jun 17, 2024 - 12:41
 0
चिपळूण : शिरगाव उपनदी पात्रावर अतिक्रमण

चिपळूण : चिपळूण- कराड महामार्गा लगत शिरगाव जवळ वाशिष्ठी नदी वाहत आहे. वाशिष्ठी नदीला येऊन जुळणारी उपनदी पात्रात शिरगाव वरची बौद्धवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नदी काठावरील शेत जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते आहे. त्याचा नाहक त्रास तेथील शेतकऱ्याना सोसावा लागत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

तसेच उपनदी पात्रा जवळील बौद्धवाडीमधील रहिवाशी पावसाळ्यात आपला जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. कारण, नदी पात्रातील अतिक्रमणामुळे नदीचा प्रवाह दिवसेन दिवस विरुद्ध बाजूस झुकत आहे. नदी पात्रात पूरसदृश परिस्थीती निर्माण झाल्यास पाण्याचा प्रवाह बौद्धवाडीकडे वळतो तरी, याबाबत योग्य नियोजन व्हावे व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता श्री. वि. खोत यांना निवेदन देऊन सुरज शिंदे यांनी केली आहे.

वाशिष्ठी नदीला जुळणारी उपनदी ही थेट सह्याद्री पर्वत रांगांहून व वाड्या वस्त्यांना लागून प्रवाहित होते. सदर उप नदीला लागून शिरगाव मधील वरचीवाडी, निगडवाडी, धनगरवाडी, देऊळवाडी, अमाईवाडी, कांबळेवाडी, गवळवाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी व अन्य वाडया आहेत. ही उपनदी शिरगाव वरची बौद्धवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या मुख्य प्रवाहाला येऊन मिळते; परंतु त्या भागातच मोठ्या प्रमाणावर नदी पात्रात अतिक्रमण झाल्या कारणाने नदी फुगवटा मारते व त्याचा परिणाम अन्य वाड्या वस्त्याना भोगावा लागतो. यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच आसपासच्या घरांना ही त्याचा नाहक त्रास होतो.

वाशिष्ठी पात्रात पावसाळ्यात कोयना धरणाचे पाणी सोडण्यात येते तसेच घाट माथ्यावरील परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो व कधी कधी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळ वाशिष्ठी नदी रौद्ररुप धारण करते त्याचा परिणाम आसपासच्या परिसरातील नागरिकांना सोसावा लागतो. घाटमाथा व सह्याद्री पर्वत रांगामुळे शिरगाव पंचक्रोशीमधील आसपासच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे वाशिष्ठी नदीपात्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. तसेच याभागातील नदी व उपनदीचे पात्र व पूर रेषा आखून देणे तसेच नदी पात्रातील रेड लाईन व ब्ल्यू लाईनची माहिती देणे. नदी पात्रातील अतिक्रमणामुळे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी व त्यासंदर्भात कडक धोरण अवलंबवणे खूप गरजेचे आहे, असे श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 17/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow