लांजा : सांडपाणी व्यवस्थापनचा आराखडा तपासणीची मागणी

Jun 19, 2024 - 14:45
 0
लांजा : सांडपाणी व्यवस्थापनचा आराखडा तपासणीची मागणी

लांजा : येथे शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासी संकुलांना परवानगी देण्यापूर्वी सांडपाणी व्यवस्थापन कसे केले आहे, याची तपासणी आधी करावी, अशी मागणी लांजा शहर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्याकडे केली.

मंगळवारी (ता. १८) मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्याशी लांजा शहर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटीत विविध विषयांवर चर्चा केली. लांजा शहरातील विविध समस्यांविषयी निर्णय घेण्यासाठी शहर समन्वय समिती स्थापन केली असून, या समितीने मुख्याधिकाऱ्यांपुढे विविध मुद्दे मांडले. नगरपंचायत हद्दीतील अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली असून, गटारांची साफसफाई केलेली नाही. तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो तसेच शहरात मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा उपद्रवही वाढला आहे. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे, याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

शहरातील ज्या ज्या ठिकाणी निवासीसंकुले आहेत तिथे सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. अनेकांनी सांडपाणी जवळच्या वहाळात सोडलेले आहे. त्यामुळे प्रदुषणाचा धोका असून संबंधित निवासी संकूल रहिवासी किंवा बिल्डर यांना परवानगी देताना येथील सांडपाण्याचा प्रश्न कसा सोडवला आहे हे पाहूनच परवानगी द्यावी, अशी मागणी केली तसेच शहरातील अन्य समस्या व विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीला हर्षला राणे, अविराज पाटील यांनी योग्य तो तोडगा काढून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. प्रसन्न शेट्ये, प्रकाश लांजेकर, सुधाकर कांबळे, चंद्रशेखर स्वामी, निरंजन देशमुख, अॅड. अभिजित जेधे, जयवंत शेट्ये, विजय कुरूप, लिंगायत, राजेश राणे आदी उपस्थित होते.

अनधिकृत घरांची संख्या वाढतेय
लांजा शहरात अनधिकृत घरांची संख्याही वाढलेली आहे. त्यांना नगरपंचायतीकडून अनधिकृत घरे म्हणून घरपट्टी दिली जाते. त्या घरांना वीजमीटर, नळजोडणी किंवा अन्य सेवा मिळत नाहीत, त्याचा विचार करून अशा अनधिकृत घरांना कायदेशीर परवानगी मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना या प्रसंगी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow