चिपळूण : वाशिष्ठीच्या जलवहन क्षमतेचा होतोय अभ्यास

Jun 19, 2024 - 12:41
 0
चिपळूण : वाशिष्ठीच्या जलवहन क्षमतेचा होतोय अभ्यास

चिपळूण : चिपळूण शहर व परिसरात २०२१ मध्ये आलेल्या महापूरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू झाले. तीन वर्षाच्या कालावधीत सुमारे १८ लाख घनमिटर गाळ काढण्यात आला. दरम्यान गाळ काढल्यानंतर वाशिष्ठी नदीची वाढलेली बहन क्षमता, खोली आदी बाबींचा सर्व अभ्यास करण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील एजन्सीमार्फत हे काम सुरू राहाणार असून लवकरच त्याचा अहवाल येणार आहे. हा अभ्यास लाल व नीळी पुररेषा संदर्भात महत्वपूर्ण ठरणार आहे.

२२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुरात चिपळूण शहर व परिसराची मोठी वित्तहानी झाली होती. त्यानंतर वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. नागरिकांनी बचाव समितीने आवाज उठवल्यानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्यास सुरवात झाली. पहिल्या वर्षात जलसंपदा विभागाची राज्यातील सर्व यंत्रणा तैनात केली होती. सुमारे ७.५० लाख घनमिटर गाळ काढला. त्यानंतर सलग दोन वर्षे गाळ काढण्याचे काम सुरूच राहीले आहे. या कामामुळे वाशिष्ठी नदीची एकूण वहन क्षमता किती वाढली, खोली किती प्रमाणात वाढली, पुराचे पाणी किती दाबाने वाहून जाऊ शकते, नदीत पाण्याचा आवाका किती आहे आदी बाबींचा अभ्यास केला जात आहे. 

हे काम पुण्यातील एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत हे काम सुरू झाले असून पावसाळ्यात देखील ते सुरू राहणार आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप नियमीत पावसाला जोर नाही. एकाच दिवशी ११० मिलीमिटरच्या वरती शहर अथवा तालुक्यात पावसाची नोंद झालेली नाही. मुसळधार पाऊस झाल्यानंतर नदीतील पुराचे पाणी किती क्षमतेने वाहून जाते, नदीत किती पाणीसाठा होऊ शकते, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून पुढील १५ ते २० दिवस हे काम सुरूच राहणार आहे. प्रत्यक्ष वाशिष्ठी नदीत हे काम सुरू आहे.

या कामावर जलसंपदा विभागाचे नियंत्रण राहिले आहे. आगामी काळात पूररेषा कमी करण्याचा निर्णय घेताना शासनाला या अभ्यासाचा उपयोग होणार आहे. पुररेषा निश्चीत करण्यासाठी हे सर्वेक्षण नसले तरी आगामी काळात पुररेषेचा निर्णय घेताना ही माहिती उपयोगी ठरू शकते, असे जलसंपदा विभागाचे उपअभियंता विपुल खोत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow