रत्नागिरी : जिल्ह्यात केवळ ५ विंधन विहिरींची काम पूर्ण

Jun 13, 2024 - 15:39
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात केवळ ५ विंधन विहिरींची काम पूर्ण

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी टंचाई आराखड्यामध्ये विंधन विहिरींचा समावेश आहे. जिल्ह्यात ३१ विंधन विहिरींपैकी पावसाळा सुरू झाला तरी अवघ्या ५ विंधन विहिरी मारून पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरून टंचाई आराखड्यातील उद्दिष्टांचे तीन तेरा वाजल्याची स्थिती आहे.

यावर्षी पाणीटंचाई आराखडा तयार करताना तालुकानिहाय पाणीटंचाई आराखडा सादर होण्यास विलंब झाला होता. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे आराखडे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे सादर झाल्यानंतर जिल्ह्यांचा टंचाई आराखडा अंतिम मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता.  टंचाईवर मात करण्यासाठीच्या उपायोजनांवर भर दिला जाणाऱ्या आराखड्यात टँकर, विंधन विहिरी, नळपाणी योजना दुरुस्ती, टंचाईची तीव्रता वाढल्यास खासगी विहिरी अधिग्रहीत करणे यांचा समावेश आहे. टंचाईवर पुढील उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून संभाव्य अंतिम आराखडा तयार करून त्याला मंजूरी देण्यात आली. यामध्ये पाणीयोजना दुरुस्ती, टैंकर, विंधन विहिरी खोदाई, विहिरी अधिग्रहित करण्यासाठी निधी तरतूद केली जाते. पण त्या टंचाई आराखड्यातील उपाययोजनांचीच कामे रखडल्याची स्थिती आहे. विंधन विहिरीच्या ३१ कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी प्रत्यक्ष ५ विंधनविहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यात २, रत्नागिरीत १ तर दापोलीमध्ये ३ कामांचा समावेश आहे. विंधन विहिरी मारण्यासाठी प्रशासनाकडे केवळ एक वाहन उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. विंधन विहीर मारण्याच्या कामांसाठी ३० जूनअखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

५५ प्रस्ताव अपूर्ण
टंचाई आराखड्यात २८६ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३५ विंधन विहिरींचे प्रस्ताव परिपूर्ण होते. ५५ प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते ग्रामपंचायतीकडे परत पाठविण्यात आले. २९ प्रस्ताव आराखड्याबाहेरील होते. अपूर्ण प्रस्तावांमध्ये बक्षीसपत्रांच्या अडचणीला प्रशासनाला सामोरे जावे लागले आहे. आता तर ३० जून जवळ आला तरीही ही कामे मार्गी लागत नसल्याने प्रशासनाच्या आराखड्यातील या कामावर पाणी फिरल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 13/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow