गुहागर मतदारसंघ भाजपकडे आणण्यासाठी हालचाली..

Jun 22, 2024 - 11:46
Jun 22, 2024 - 15:52
 0
गुहागर मतदारसंघ भाजपकडे आणण्यासाठी हालचाली..

गुहागर : नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून केव्हाही विधानसभा निवडणूक बिगूल वाजू शकते यामुळे. भाजपने संभाव्य उमेदवारांची शोधमोहीम सुरू केल्याचे समजते. दरम्यान, भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याऐवजी नवा चेहरा मतदारसंघात द्यावा, अशी चचदिखील झाली आहे. त्यामुळे गुहागर मतदारसंघ पुन्हा भाजपकडे आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

गुहागर विधानसभा मतदारसंघातील गुहागर मधील १४० मतदान केंद्रातील तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, चिपळूण ९२ मतदार केंद्रातील अध्यक्ष अजित थरवळ तर खेड ९० मतदार केंद्रातील अध्यक्ष किशोर आंब्रे यांच्या उपस्थितीत स्वतंत्र केंद्रातील बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चर्चा झाली. यात नव्या दमाचा नवीन पिढीतील उमेदवार जिंकेल असे सूचवण्यात आले. मात्र, विनय नातू यांचे मार्गदर्शन, पाठिंबा असेल तरच नवा चेहरा या निवडणुकीत बाजी मारेल अशीही चर्चा झाली. अर्थात या सर्व गोष्टी विनय नातू यांनी मान्य केल्या असून उमेदवार आणण्यापासून त्याच्या प्रचाराची मुख्य भूमिका घेण्याचे त्यांनी मान्य केले असल्याचे समजते. यामुळे भाजपमध्ये आता नवीन चेहऱ्यांचा शोध सुरू झाला आहे, अर्थात नवीन चेहऱ्यांत ओबीसी किंवा कुणबी यातूनच चेहरा निवडला जाणार आहे. यासाठी संभाव्य उमेदवार म्हणून गुहागर भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, प्रशांत शिरगावकर, नीलम गोंधळी, संतोष जैतापकर तर कुणबी उमेदवार संतोष मालप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या गुहागर विधानसभेतील प्रचाराची प्रमुख जबाबदारी माजी आमदार विनय नातू यांनी घेतली होती. या निवडणुकीत भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट तसेच महायुतीतील मित्रपक्ष यांना सोबत घेऊन विधानसभा मतदारसंघात भाजप पूर्ण ताकतीनिशी उत्तरला होता. या निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वासही भाजपने व्यक्त केला होता. परंतु, या मतदारसंघातील गुहागर, चिपळूण व खेडमधून मताधिक्य मिळाले नाही.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रामदास कदम वगळता तटकरे यांच्या प्रचारासाठी आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत गुहागरमधून विनय नातूच यांचा उमेदवार म्हणून नामोल्लेख केला होता. मात्र, याला अपवाद रामदास कदम होते, रामदास कदम यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघात कुणबी उमेदवार देऊया अशीच मागणी नातू यांच्याकडे केली होती. या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपला आघाडी घेण्यासाठी या विधानसभा मतदारसंघातील गुहागर, चिपळूण व खेडमध्ये अपयश आलं हे निकालीच्या आकडेवारीवरूनच समजते.

सन २००९ ला गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधव हे निवडून आले. त्यानंतर त्यांनी एकदा पक्ष बदलूनही या मतदारसंघात आपले वर्चस्व अद्यापही कायम ठेवले आहे. त्यामुळे गुहागर मतदारसंघ परत भाजपकडे घ्यायचा असेल, तर आता नवा चेहरा हवा अशी चर्चा सुरू आहे. माजी आमदार विनय नातू यांच्यावर राग नाही. मात्र, हा मतदारसंघ या निवडणुकीत परत भाजपकडे आणण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

मतदारसंघाला वेध ओबीसी चेहऱ्याचे
या मतदारसंघात भाजपमध्ये आता नवीन चेहऱ्यांचा शोध सुरू झाला आहे, अर्थात नवीन चेहऱ्यात ओबीसी किवा कुणबी यातूनच चेहरा निवडला जाणार आहे. यासाठी संभाव्य उमेदवार म्हणून गुहागर भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, प्रशांत शिरगावकर, नीलम गोंधळी, संतोष जैतापकर तर कुणबी उमेदवार संतोष मालप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow