'या' मुस्लिमबहुल देशात हिजाब आणि बुरख्यावर बंदी; संसदेकडून कायदा मंजूर

Jun 22, 2024 - 15:47
 0
'या' मुस्लिमबहुल देशात हिजाब आणि बुरख्यावर बंदी; संसदेकडून कायदा मंजूर

 गेल्या काही काळापासून फक्त भारतातच नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये हिजाब आणि बुरखा परिधान करण्यावरुन वाद सुरू आहे. अनेक देशांनी यावर बंदी घातली आहे, तर काही देश बंदीच्या विचारात आहेत.

अशातच आता मध्य आशियातील मुस्लिम देश असलेल्या ताजिकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या संसदेने हिजाब आणि बुरखा यांसारख्या इस्लामिक कपड्यांवर बंदी घालण्यासाठी थेट कायदाच काढला आहे. सध्या या कायद्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर
ताजिकिस्तानच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक 19 जून रोजी मंजूर केले आहे. सभागृहाने कायदा मंजूर करताना या पोषाखाला "विदेशी" संबोधले. याशिवाय ताजिकिस्तानने 'ईदी'च्या सणादरम्यान लहान मुलांच्या पैसे मागण्याच्या प्रथेवरही बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, सुमारे 1 कोटी लोकसंख्या असलेल्या ताजिकिस्तानमधील 96% पेक्षा जास्त लोक इस्लाम धर्माचे पालन करतात.

अध्यक्ष रुस्तम इमोमाली यांच्या नेतृत्वाखालील संसदेच्या 18 व्या अधिवेशनात कायद्यात बदल करण्यापूर्वी या विधेयकावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान, ताजिकिस्तान संसदेने म्हटले की, महिलांनी चेहरा झाकणे अथवा हिजाब घालणे, हा ताजिक परंपरा आणि संस्कृतीचा भाग नाही. या कारणास्तव अशा विदेशी कपड्यांवर देशात बंदी घातली पाहिजे. हा कायदा नुकताच दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. आता हा कायदा लवकरच लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, या विधेयकाबाबत देशाच्या विविध भागांतून अनेक आंदोलने होत आहेत.

नियमांचे पालन न केल्यास मोठा दंड
नव्या कायद्यानुसार कायदा मोडणाऱ्यांना जबर दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन विधेयकानुसार कायदा मोडल्यास एका व्यक्तीला 7,920 सोमोनी (सुमारे 61,623 भारतीय रुपये) पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, तर कंपन्यांना 39,500 सोमोनीपर्यंत दंड होऊ शकतो. याशिवाय सरकारी अधिकारी आणि धार्मिक नेते दोषी आढळल्यास आणखी जास्त दंड भरावा लागू शकतो. अधिकाऱ्यांसाठी 54,000 सोमोनी आणि धार्मिक नेत्यांसाठी 57,600 सोमोनीपर्यंत दंड आकारला जाईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow