चिपळूण : नगरपालिकेच्या पाणी योजनेतून गढूळ पाण्याचा पुरवठा

Jun 24, 2024 - 12:21
 0
चिपळूण : नगरपालिकेच्या पाणी योजनेतून गढूळ पाण्याचा पुरवठा

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून येथे पावसाचा जोर वाढलेला असतानाच, शहरात नगरपालिकेच्या पाणी योजनेतून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे शहरातील नागरिक हैराण झाले असून, शहरातील काही भागात उलटी, जुलाबाची साथही सुरू झाली आहे. याबाबत नगर परिषदेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. यामुळे नगरपालिकेने शुद्धीकरणावर अधिक भर देण्याचे नियोजन सुरू केले आहे.

सलग तीन दिवस येथे मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे येथील वाशिष्ठी नदीला गढूळ पाणी आल्याने तेच पाणी खेर्डी व गोवळकोट येथील जॅकवेलमधून शहरात पुरवले जात आहे; परंतु गोवळकोट येथील जॅकवेलमधून अर्ध्या शहरात पुरवठा करण्यात येणारे पाणी अत्यंत गढूळ आहे. गोवळकोट, गोवळकोट रोड, मुरादपूर, पेठमाप, शंकरवाडी व बाजारपेठेतील काही भागांत गढूळ पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गोवळकोट येथील शुद्धीकरण केंद्रात अनेक वर्षात वाळू बदललेली नाही. तसेच साठवण टाक्यांची साफसफाई न केल्याने त्याचाही फटका बसत आहे. त्यातच पाणी शुद्धीकरणासाठी तुरटीचा वापर कमी केला जात असल्याने नदीतून येणारे पाणी थेट नागरिकांना पुरवण्याचा प्रकार सुरू आहे. गढूळ पाण्यामुळे या परिसरातील लहान मुलांसह वयोवृद्धांना उलटी, जुलाबाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गढूळ पाण्याची ओरड मोठ्या प्रमाणात नागरिकांमधून केली जात आहे.

याबाबत गोवळकोट येथील मनाली खेराडे यांनी सांगितले, गेले आठवडाभर गढूळ पाणी येत आहे. याविषयी शिंदे गटाचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित विभागाचे कर्मचारी चौकशीसाठी येऊन गेले. त्यांनी शुद्धीकरणावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु अजूनही या परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा अविरतपणे सुरू आहे.

पावसामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असला, तरी त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. जलशुद्धीकरण केंद्रात तुरटीचा वापर कमी केला जात होता; परंतु आता त्यात वाढ करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे शहरात शुद्ध पाणीपुरवठा होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय क्लोरीन गॅसचाही वापर केला जाणार आहे. नागेश पेठे, अभियंता, नगरपालिका पाणीपुरवठा विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 24/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow