खेड नगरपरिषदेकडून आपत्कालीन परिस्थिती रोखण्यासाठी विशेष नियोजन

Jun 11, 2024 - 11:52
Jun 11, 2024 - 11:56
 0
खेड नगरपरिषदेकडून आपत्कालीन परिस्थिती रोखण्यासाठी विशेष नियोजन

खेड :  शहराचा भाग हा पूर प्रवण क्षेत्र असल्याने आगामी पावसाळ्यासाठी येथील नगर परिषदेने आपत्कालीन परिस्थिती सोबत सामना करण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. नाले सफाई व अन्य मान्सूनपूर्व कामांना देखील गती देण्यात आली आहे.

खेड शहरात पूर भरण्याची संभाव्य १२ ठिकाणे नोंदवण्यात आली आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर या चार भागात तातडीने काम करण्यासाठी नियोजन करून चार पथके तयार करण्यात आली आहेत. बाजारपेठ, पोत्रिक मोहल्ला, साठी मोहल्ला, तांबे मोहल्ला, निवाचा चौक, गांधी चौक, पान गल्ली, वाळकी गल्ली, गुजर आळी, पद्मलेवाडी, डेंटल कॉलेज परिसर, खांबळे परिसर हे १२ भाग पूरबाधित म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 

शहरात सन २०२१ ला महापूर आला, त्यानंतर दरवर्षी काही भागांत पुराचे पाणी घुसत आहे. याचा विचार करून यावर्षी नगरपरिषदेने मुख्याधिकारी चेतन विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले, नोडल अधिकारी प्रणव सस्ते, नगर रचनाकार अधिकारी शुभम खेतल, कर व प्रशासकीय अधिकारी दीपा चव्हाण, रोखपाल रुपेश डंबे, पाणीपुरवठा विभागाचे उमेश रेपाळ, वायरमन मनोज म्हातले, अग्रिशमन विभागाचे श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सुजित जाधव यांच्या अनुभवातून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्याठिकाणी पथके तैनात राहणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन टीममध्ये तातडीने मदत पुरवण्यासाठी राजेश खेडेकर, सुबोध जाधव, संदेश मोहिते, विपुल बर्वे, वासू चव्हाण, अरविंद चव्हाण यांचा समावेश आहे. आपदग्रस्तांना वैद्यकीय मदतीला रचिता जाधव, संतोष जाधव यांच्यासह अन्य कर्मचारी नियुक्त केले आहेत.

धोक्याचे भोंगे वाजणार
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी एक बोट, दोन छोट्या होड्यांसह प्रशिक्षित कर्मचारी व स्वयंसेवक तातडीने मदतीसाठी धाऊन येतील अशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास शहरातील आठ भागात धोक्याचा इशारा देणारे भोंगे वाजणार आहेत, पोहता येणाऱ्या तीस तरुणाचे संपर्क देखील पालिकेने संकलित केले आहेत. गरज भासल्यास त्यांची मदत घेतली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 11/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow