लांजा : वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन ठाकरे शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा

Jun 27, 2024 - 14:37
 0
लांजा : वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन ठाकरे शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा

लांजा : तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. या विरोधात आमदार राजन साळवी यांनी शिवसैनिकांसह महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. शुक्रवारपर्यंत नागरिकांच्या तक्रारी न सोडवल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा दिला.

लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येथील स्थानिकांकडून वारंवार महावितरणकडे केल्या जात आहेत. या भागातील कामे महावितरण कंपनीकडून पावसाळ्यापूर्वीच करणे अपेक्षित होते. ती न केल्यामुळे गेले काही दिवस तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत दिलेल्या तक्रारीची दखल वेळेत कक्षेतली जात नाही. बारा ते पंधरा तास वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे लांजावासीयांनी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्न शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांपुढे मांडला. आमदार राजन साळवी यांनी त्याची दखल घेत लांजा महावितरण कार्यालयावर धडक दिली. शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांपुढे समस्यांचा पाढाच वाचला. येथील नागरिकांच्या वीज पुरवठ्याबाबतच्या समस्या तत्काळ सोडवल्या पाहिजेत, अशी सूचनाही केली. यावेळी उपअभियंता दयानंद अष्टेकार यांनी लोकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी नीलेश कुलकर्णी यांची नोडल ऑफिसर म्हणून तातडीने नेमणूक केली. तसेच लांजा शहरात रात्रीसाठी अतिरिक्त एक वायरमन नियुक्त करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच तालुक्यातील पूर्व विभागातील गावांसाठी एकत्रित एक नवीन फिडर तळवडे रेल्वेस्टेशन ते आडवली ही नवीन लाईन लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक
लांजा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने तातडीने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली. नोडल ऑफिसर अधिकारी म्हणून नीलेश कुलकर्णी यांच्यासह रात्रीच्या वेळी समस्या निर्माण झाल्यास ती सोडविण्यासाठी एका वायरमनची नियुक्ती करण्यात आली असून, तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे उपअभियंता दयानंद अष्टेकर यांनी सांगितले.

मोबाईल चार्जिंगची अडचण
लांजा तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिकांना मोबाईल चार्जिंग करणेही अवघड बनले आहे. आज संपर्काचे सर्वांत महत्त्वाचे साधन म्हणून मोबाईलकडे पाहिले जाते. पण, वीज बंद, मोबाईल बंद अशी जणू अवस्था या परिसरात पाहावयास मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow