लांजा : ब्लास्टिंगमुळे वेरळ गावातील घरांना हादरे, भिंतींना तडे

May 28, 2024 - 15:14
 0
लांजा : ब्लास्टिंगमुळे वेरळ गावातील घरांना हादरे, भिंतींना तडे

लांजा : तालुक्यातील वेरळ आणि कुर्णे गावच्या सीमेवर महामार्गासाठी लागणाऱ्या खडीसाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे वेरळ गावातील अनेक घरांना हादरे बसत असून भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत.

याबाबत तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयांना निवेदन देऊनही ब्लास्टिंग आणि क्रशरचे काम सुरू असल्याने अखेर सोमवारी २७ मे रोजी सायंकाळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत घटनास्थळी जाऊन क्रशर आणि ब्लास्टिंग चे काम बंद पाडले.

मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी वेरळ गावानजीक वेरळ आणि कुर्णे या गावच्या सीमेवर असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळ्या दगडाचे उत्खनन सुरू आहे.. मात्र शासकीय परवानगी पेक्षा जास्त प्रमाणात खोल म्हणजे ३० ते ४० फुट खोल काळया दगडाचे ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.आणि त्यामुळेच वेरळ गावातील अनेक घरांच्या भितींना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून घरेही धोकादायक बनली आहेत. अगदी कच्च्या पक्क्या घरांबरोबरच स्लॅबच्या घरांच्या भिंतीना देखील तडे गेल्याने ग्रामस्थांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

त्याचप्रमाणे २४ तास चालणाऱ्या क्रशरचा मोठा त्रास गावातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. गावातील काही घरांमध्ये आजारी रुग्ण आहेत मात्र रात्रीच्या वेळी देखील हा क्रेशर सुरू असल्याने त्याचा त्रास आजारी रुग्णांना सहन करावा लागत आहे .याखेरीज ब्लास्टिंग आणि क्रशरमुळे अनेक ग्रामस्थांच्या घरात धुळीचे साम्राज्य पसरले असून आंबा, काजू सारख्या फळझाडांवर मोठ्या प्रमाणात धुळ साचून नुकसान होत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी पत्रकारांना दिली.

गेले काही दिवस बिनबोभाटपणे हा प्रकार सुरू होता. याबाबत ग्रामस्थांनी संबंधित क्रशरचालक आणि ब्लास्टींग करणाऱ्या ठेकेदारांना माहिती देऊनही त्यांच्याकडून आम्ही परवानगी घेतली आहे अशा प्रकारे दुरुत्तरे दिले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी पत्रकारांना दिली. वेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने देखील संबंधितांना याबाबतच्या सूचना देऊनही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने अखेर लांजा तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांना देखील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते.

इतके होऊनही मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग आणि क्रशर सुरुच असल्याने अखेर सोमवारी सायंकाळी वेरळ ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सदरची क्रशर आणि ब्लास्टिंग चे काम बंद पाडले आणि जोपर्यंत यावर योग्य तो तोडगा निघत नाही तोपर्यंत क्रशर आणि ब्लास्टिंग चे काम बंद ठेवावे अशा सक्त सूचना ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 28-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow