खेड : शिव येथे दरोडा घालणाऱ्या फरार आरोपीला ३० वर्षांनी अटक; न्यायालयाने सुनावली ७ वर्षाची सक्तमजुरी

Jun 29, 2024 - 10:16
Jun 29, 2024 - 10:20
 0
खेड : शिव येथे दरोडा घालणाऱ्या फरार आरोपीला ३० वर्षांनी अटक; न्यायालयाने सुनावली ७ वर्षाची सक्तमजुरी

◼️ तपास करणाऱ्या पोलिसांना बक्षिस

खेड : तालुक्यातील शिव येथे दि. १३ नोव्हेंबर १९९४ रोजी परकार कुटुंबाच्या घरात साथीदारांना घेऊन सशस्त्र दरोडा घालणाऱ्या शाम बिंद्रावन कैथवास (मौजे रा. सावरगांव ता. जि. वाशिम) याला खेड पोलिसांनी तब्बल ३० वर्षांनी अटक करुन घेऊन खेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सात वर्षे सक्तमजुरीसह एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे बक्षिस म्हणून दंडाच्या रकमपैकी २५ हजार ही पोलिस कल्याण निधीला देण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, दि. १३ नोव्हेंबर १९९४ रोजी शाम बिंद्रावण कैथवास याने खेड तालुक्यातील मौजे शिव येथील इब्राहिम अहमद परकार यांचे घरी पहाटेचे वेळी आपले साथीदारांसोबत सशस्त्र दरोडा टाकला. इब्राहीम अहमद परकार यांचे डोक्यात वार केला होता तर त्यांचे सुनांना आणि इतर घरातील व्यक्तींना चाकू चा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागदागिने, किमती घडयाळे आणि रोकड चोरुन नेली होती. दरोडा टाकून शाम बिंद्रावण कैथवास हा फरार झाला होता. या प्रकरणी ३० वर्षांपूर्वी खेड पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोन आरोपिंचा मृत्यू झाला व बाकी आरोपी फरार होते.

त्यापैकी मुख्य आरोपी शाम बिंद्रावन कैथवास हा जुलै २०२३ मध्ये पोलिसांना सापडला. त्याला रत्नागिरी कारागृह येथे ठेवून त्याच्या विरुध्द खेड न्यायालयात खटला चालवण्यात आला. अतिरिकीत सत्र न्यायालय-१ खेड चे न्यायाधिश डॉ. सुधीर एम. देशपांडे यांनी शाम बिंद्रावन कैथवास (रा. सावरगांव ता. जि. वाशिम) यांस ७ वर्षे सश्रम कारावास आणि रुपये १लाख रुपये इतका दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

पोलिसांनी ३० वर्षानंतर आरोपीस अथक परिश्रमाने पकडून आणून केस संदर्भातील कागदपत्रे आणि पुरावे जतन करुन आवश्यक साक्षीदार आणि इतर कागदपत्रे न्यायालयासमोर हजर केल्याचे कौतुक करून न्यायाधीश यांनी दंडातील २५ हजार रुपये ही रक्कम पोलीस कल्याण निधीला भरण्याचे आदेश दिले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. आणि परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडणेत आला. या प्रकरणी इब्राहीम अहमद परकार (९२) यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी वकील अॅड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले. या खटल्यात तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक पी.एस. सातोसे तसेच कोर्ट पैरवी चंद्रमुनी ठोके यांचे न्यायालयाला सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 29-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow