कशेडी बोगद्याच्या डोंगरावरील भागाचे सर्वेक्षण; गळती रोखण्यासाठी ग्राउटिंग

Jun 29, 2024 - 10:11
 0
कशेडी बोगद्याच्या डोंगरावरील भागाचे सर्वेक्षण; गळती रोखण्यासाठी ग्राउटिंग

रत्नागिरी : कशेडी बोगद्यातील गळती रोखण्यासाठी ग्राउटिंगचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, दोन पथके दिवसभर कार्यरत आहेत. बोगद्याच्या डोंगराकडील भागाची पाहणी आयआयटीच्या तज्ज्ञांकडून केली जाणार आहे. त्या ठिकाणी विहिरी, विंधन विहिरी किंवा झरे असल्यास ते पाणी अन्यत्र कसे वळवले जाईल या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. पुढील महिन्याभरात हा अभ्यास पूर्ण होईल. याला राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दुजोरा दिला.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात १४ ठिकाणी लागलेल्या गळतींमुळे दोन्ही बाजूने मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. बोगद्यातील गळतीमुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग खडबडून जागे झाले आहे. बोगद्यातील गळत्या थोपवण्यासाठी तातडीने 'ग्राउटिंग'चे काम हाती घेतले आहे. वरच्या भागातून गळणाऱ्या पाण्याचा गटाराद्वारे निचरा करण्यात येणार आहे.

हे काम पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. बहुचर्चित कशेडी बोगद्यातून दोन्ही बाजूंनी वाहनचालकांचा प्रवास सुस्साट अन् आरामदायी झालेला असतानाच ५ दिवसांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर बोगद्यात १४ ठिकाणी गळती सुरू झाली आहे. यामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर असून, अनेक वाहनचालकांनी बोगद्याकडे पाठ फिरवली आहे तर काही वाहनचालक जीव मुठीत धरून बोगद्यातून मार्गस्थ होत आहेत. बोगद्यातील दुतर्फा वाहनांचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या हालचाली महामार्ग विभागाकडून हाती घेतले आहेत. त्यापूर्वी तांत्रिक सल्लागार एस. के. धर्माधिकारी यांनी बोगद्यातील या गळती लागलेल्या भागाची पाहणी केली. बोगद्याला धोका नसल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. गळती बंद करण्यासाठी ग्राउटिंग करण्यात येणार आहे.

पुढील आठवड्यात रात्रीही काम
एका पथकामध्ये दहा ते बारा कामगार आहेत. त्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. पुढील आठवड्यात रात्रीही काम सुरू केले जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. झरे किंवा डोंगरावरील विहिरींचे पाणी पावसाळ्यात झिरपत खाली येत असल्याचे पाहणी अहवालात नमूद केले आहे. त्यासाठी डोंगरावरील भागाची येत्या काही दिवसांत पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईचे प्रा. एस. के. यांची नेमणूक केली आहे.

असे केले जाते ग्राउटिंग
गळती होणाऱ्या भागाच्या बाजूला ड्रील करून त्यात विशिष्ट मिश्रण असलेले सिमेंट टाकले जाते. ते सिमेंट वेगाने होलमध्ये पसरते. त्यामुळे ते होल बंद होतात. ते पाणी अन्य बाजूने बाहेर पडण्यासाठी दुसरे होल मारले जाणार आहेत. डोंगराच्या वरील बाजूचे पाणी शेजारच्या भागातून गटारात आणले जाईल, पाणी येत असलेले होल बंद होत नाहीत तोपर्यंत त्यात सिमेंट टाकले जाणार आहे. आतापर्यंत शंभर गोणी सिमेंटचा वापर केला गेला आहे. एका होलसाठी एक हजार गोणी सिमेंट लागेल, असा अंदाज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow