चार्टर्ड अकाउंटंटच्या सन्मानार्थ दापोलीत सायकल फेरी

Jul 1, 2024 - 11:38
 0
चार्टर्ड अकाउंटंटच्या सन्मानार्थ दापोलीत सायकल फेरी

रत्नागिरी : आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) दिवस दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सीए मान्यवरांच्या सन्मानार्थ दि. ३० रोजी सायकल फेरी काढण्यात आली आणि दापोलीतील सीए मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत, हे पटवून देण्यासाठी काढण्यात आलेली ही सायकल फेरी दापोलीच्या आझाद मैदानातून निघाली. ती केळस्कर नाका, बुरोंडी नाका, लाल कट्टा, नर्सरी रोड, आझाद मैदान असा ५ किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा आझाद मैदानावर दाखल झाली. फेरीमध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. दापोलीतील पहिले सीए संदीप खोचरे, पहिल्या महिला सीए सौ. अनुराधा परांजपे, सीए किरण परांजपे, सीए श्रेयस काकिर्डे, सीए सौ. अंजली फाटक, सीए कौस्तुभ दाबके, सीए मुनाझ्झा शेख, सीए ऋषिकेश शेठ सायकल चालवत सहभागी झाले होते. देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक असलेली सीएची परीक्षा, आर्थिक क्षेत्रातील विविध माहिती, इत्यादींबद्दलचे मार्गदर्शन या सर्वांनी गप्पागोष्टी करत केले. सीए दिवसाच्या या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. सायकल फेरी मार्गावरील काही मान्यवर डॉक्टरांना भेटून डॉक्टर दिवसाच्याही शुभेच्छा देण्यात आल्या.

या सायकल फेरीचे नियोजन करण्यात राजेशकुमार कदम, प्रशांत पालवणकर, अंबरीश गुरव, केतन पालवणकर, बाळासाहेब नकाते इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकलविषयक अनेक उपक्रम विनामूल्य राबवले जातात. सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow