रत्नागिरी : १५ जुलैपासून एसटीच्या प्रत्येक आगारात 'प्रवासी राजा' दिन

Jul 5, 2024 - 13:17
 0
रत्नागिरी : १५ जुलैपासून एसटीच्या प्रत्येक आगारात 'प्रवासी राजा' दिन

रत्नागिरी : प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने एसटीच्या प्रत्येक आगारात दर सोमवारी आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे. येत्या १५ जुलैपासून या उपक्रमाचा प्रारंभ होईल.

प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये यांनी आपल्या समस्या-तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडाव्यात. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. प्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्या, त्या वेळी जाहीर करतील. विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्ररीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे.

एसटीच्या विविध बसेसमधून प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. प्रवाशांना एसटी बसस्थानक, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप असावीत असे वाटते. तसेच एसटी बसेस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहकांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. यासंबंधी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते. प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक असते. तसे झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य होणार आहे. प्रवाशांचे महत्तम समाधान हा उद्देश ठेवून येत्या १५ जुलैपासून प्रवासी राजा दिन या अभिनव योजनेचे आयोजन करण्यात येणार आहे.

सर्व प्रवासी बंधूभगिनींनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:46 05-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow