MLC Election 2024: विधानपरिषद निवडणुकीतून कोणाचीही माघार नाही, 11 जागांसाठी 12 जण लढणार

Jul 5, 2024 - 15:34
 0
MLC Election 2024: विधानपरिषद निवडणुकीतून कोणाचीही माघार नाही, 11 जागांसाठी 12 जण लढणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या 12 जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक (MLC Election 2024) होत आहे. या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

शुक्रवारी विधानपरिषदेचे उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अपक्ष उमदेवार जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यापैकी एकजण माघार घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वेळ संपूनही कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता येत्या 12 तारखेला विधानपरिषदेच्या निवडणुकीत (MLC Election 2024) चुरस पाहायला मिळेल.

12 जुलैला विधान परिषदेसाठी विधिमंडळात मतदान पार पडेल. हे मतदान गुप्त पद्धतीने होत असल्याने मोठ्याप्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. तसेच गुप्त पद्धतीमुळे मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाची मतं फुटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने (BJP) एकूण पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोघे मैदानात उतरले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील, काँग्रेस पक्षाकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध या निवडणुकीत कामाला येणार का, हे पाहावे लागेल. तसे झाल्यास मिलिंद नार्वेकर सत्ताधारी महायुतीमधील कोणत्या पक्षाची मतं फोडणार, हे पाहावे लागेल.

कुणाकडे किती संख्याबळ ?

महायुती

भाजप -103 शिंदे सेना – 37 राष्ट्रवादी (AP) - 39 छोटे पक्ष - 9 अपक्ष - 13 असे एकूण - 201

मविआ

काँग्रेस - 37 ठाकरे गट - 15 राष्ट्रवादी (SP) - 13 शेकाप - 1 अपक्ष - 1 असे एकूण - 67

एमआयएम - 2, सपा - 2, माकप - 1 क्रां. शे. प. - 1 एकूण - 6 आमदार तटस्थ आहेत.

विधानसभेचं एकूण 274 एवढं संख्याबळ आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:02 05-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow