जोरदार पावसामुळे गुहागरात जनजीवन विस्कळीत

Jul 10, 2024 - 10:08
Jul 10, 2024 - 10:59
 0
जोरदार पावसामुळे गुहागरात जनजीवन विस्कळीत

गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी कोसळलेल्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला तडाखा दिला. धुवाधार पावसामुळे अनेक मार्गावर व पुलांवरून पाणी गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. नद्या, नाल्यांशेजारील भातशेती पाण्याखाली गेली तर काही घरे व दुकानांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. तालुक्यातील काही ठिकाणी घरे व जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले.

रविवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाची संततधार सायंकाळपर्यंत कायम राहिल्यामुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गुहागर खालचापाट भागातील भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. असगोली वरचीवाडी गावाकडे जाणाऱ्या पुलावरून गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. गुहागर बसस्थानकासमोरील रस्ताही पाण्याखाली होता. यामुळे या ठिकाणी असणाऱ्या रिक्षा अन्यत्र हलविण्यात आल्या. जोरदार पावसामुळे गुहागरसह शृंगारतळी, आबलोली बाजारपेठेत शांतता होती. जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक ठिकणी नद्यांची पाणी पातळी वाढली, काही भागात रस्त्यांना गटारांचे योग्य नियोजन नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पेवे गावातील मादाली व कोतळुक कासारी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती.

दरवर्षी पालशेत पुलावरून देखील पाणी जाते. मात्र, यावर्षी हा पूल नव्याने बांधण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत होती. रविवारी झालेल्या अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे उमराठ डागवाडीतील कृष्णा गोविंद गोरिवले यांचा जनावरांचा गोठा कोसळून नुकसान झाले. तालुक्यातील मौजे कुटगिरी येथील आशा बाळू कदम यांच्या कच्चे घराचे पडवी पडून घरांचे अंदाजे १०,०९० रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. याच गावातील दत्ताराम बाळाराम पवार यांच्या जनावरांच्या गोठ्याचे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. 

सोमवारी वरचापाट गुहागरकडे जाणाऱ्या मार्गावरील आरे बाग पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती. नदीतील पुराचे पाणी शेजारील बागेमध्ये शिरले होते. तसेच आरे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर देखील पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे शृंगारतळीमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. मुसळधार पावसाचा वेलदूर नवानगर परिसराला फटका बसला. लगतच दाभोळ खाडी असल्याने समुद्राला भरती आल्यास नवानगर (घटी) येथील कुटुंबांना व घराना आणखी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

घरे, दुकानांमध्ये शिरले पाणी...
गुहागर- रत्नागिरी महामार्गावरील आबलोली येथील चंद्रकला पेट्रोल पंपासमोर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. पेट्रोल पंप व आजूबाजूच्या परिसरातून पावसाचे पाणी महामार्गावरून थेट समोरच असणाऱ्या नदीला जाऊन मिळत होते. त्यामुळे महामार्गावरती सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शृंगारतळी बाजारपेठेतून शृंगारीकडे जाणाऱ्या मार्गावर पावसाचे पाणी वाहत होते. लगतच्या दुकानांमध्येही हे पाणी शिरले होते. रोशन मोहल्ला येथे नूरजहाँ घारे यांच्या चाळीमध्ये पाणी शिरले होते. या परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. शृंगारतळीतील रामदास पांडुरंग बेलवलकर (गणेश नगर) यांच्या घराची संरक्षण भिंत पडून सुमारे १५ हजारांचे नुकसान झाले. एकूणच रविवार व सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे गुहागर तालुक्यातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow