सिंधुदुर्ग : राजन तेलींची भाजपमधून हाकालपट्टी करा, दीपक केसरकरांची मागणी

Jul 10, 2024 - 11:08
Jul 10, 2024 - 12:13
 0
सिंधुदुर्ग : राजन तेलींची भाजपमधून हाकालपट्टी करा, दीपक केसरकरांची मागणी

सिंधुदुर्ग : तळकोकणात महायुतीमध्ये (Mahayuti) वादाची ठिणगी पडली असून सध्या हा वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांच्यात विस्तव विजता विजत नसल्याचे चित्र आहे.

अशातच आता मंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीनं पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील (Sindhudurg News) राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजन तेली यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच, आम्ही महायुतीत आलो, त्यामुळेच हे सरकार स्थापन झालं, असंही दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना सुनावलं आहे.

तळकोकणात मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. राजन तेली यांच्यावर निशाणा साधत दीपक केसरकरांनी त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. यावेळी दीपक केसरकर संतप्त होऊन आम्ही महायुतीमध्ये आलो म्हणून हे सरकार स्थापन झालं, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राजन तेली यांचं महाराष्ट्रातील अस्तित्व काय आहे? त्यांना आमदार व्हायचंय म्हणून ते पातळी सोडून टीका करतात. महायुती अडचणीत असताना चुकीची वक्तव्य कुणी करू नये, असंही म्हणतात.

मंत्री दीपक केसरकरांच्या टीकेला भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी पलटवार केला आहे. तुम्ही ज्या-ज्या वेळी माझी तक्रार केली. त्या-त्या वेळी पक्षानं मला बढती दिली आहे. त्यामुळे तुम्ही माझी तक्रार कराच, असं खुलं आव्हान राजन तेली यांनी दीपक केसरकरांना दिलं आहे. दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगत राजन तेली यांनी दिपक केसरकर यांच्यावर पलटवार केला आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद विकोपाला पोहोचला असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्गात महायुतीत सध्या सारं काही आलबेल नसल्याचंच चित्र आहे.

दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघावर भाजपचा डोळा?

दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याच्या चर्चांनी सिंधुदुर्गात जोर धरला आहे. भाजपकडून राजन तेली विधानसभेसाठी इच्छुक असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, असा ठरावच भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडला आहे. या बैठकीला राजन तेली यांच्यासह जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान, नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली आहे, सिंधुदुर्गात भाजपला जनतेने कौल दिला आणि नारायण राणे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले आहेत. आता लोकसभेला मिळालेल्या यशानंतर विधानसभेसाठी भाजप सावंतवाडी मतदारसंघावर दावा करताना दिसत आहे. माजी आमदार राजन तेली यांनी दोन वेळा सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. मात्र आता सावंतवाडी विधानसभा भाजपला मिळावी यासाठी राजन तेली यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow