Breaking : नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, मतदारांना धमकावून विजय मिळविल्याचा आरोप

Jul 13, 2024 - 10:32
 0
Breaking : नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, मतदारांना धमकावून विजय मिळविल्याचा आरोप

मुंबई : भाजपचे नारायण राणे(Narayan Rane) यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी (Vinayak Raut) दाखल केली आहे. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

राणेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला. नारायण राणेंचा 47858 मतांनी विजय झाला. मात्र, राणेंचा हा विजय कपटनीती आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. मते विकत घेऊन, मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली आहे. नारायण राणेंनी मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या,अशी याचिकेतून मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक काळात अनेक गैरप्रकार

नारायण राणे त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केला आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र कारवाई झाली नाही म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला आयोगाच्या अधिका-यांनी हरताळ फासल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

काय आहे याचिका?

निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली, त्याचाही उल्लेख या याचिकेत करण्यात आलेला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 13-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow