देवरुखमध्ये रंगणार सात थरांची दहीहंडी

Aug 27, 2024 - 15:26
 0
देवरुखमध्ये रंगणार सात थरांची दहीहंडी

देवरूख : मंगळवारी शहरात दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. देवरूख येथील गोविंदा पथके सात थर लावण्यात माहिर आहेत. विविध पक्ष, संघटना यांनी भरपूर बक्षिसांची मालिका व करमणुकीचे कार्यक्रम यांचे आयोजन केले आहे.

उबाठा गट देवरूख शहर शिवसेनेतर्फे तसेच छोट्या गवाणकर मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी उत्सवाची रंगत वाढणार आहे. या ठिकाणी सात थरापर्यंतच्या सलामीसाठी बक्षिसे व सन्मानचिन्ह ठेवण्यात आले आहेत. छोट्या गवाणकर, बंड्या बोरुकर यांच्या नियोजनात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. या दहीहंडी उत्सवात शालेय स्तरावरील रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. खास आकर्षण म्हणून महाराष्ट्र शासनाचा कलाश्री कलारत्न युवा पुरस्कार मिळवणारा कलाकार कुणाल पाटील लावणी नृत्ये सादर करणार आहे. शिंदे गट शिवसेनेतर्फे माजी आमदार सदानंद चव्हाण व किरण सामंत पुरस्कृत देवरूख बसस्थानकानजीक दहीहंडी उत्सव सोहळा रंगणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्राची लोकधारा हा मराठमोळा कार्यक्रम होणार आहे. ७ थराला १० हजार, ६ थराला ६ हजार, ५ थराला ५ हजार, ४ थराला ३ हजार व लाडकी बहीण महिला गोविंदा पथकासाठी ५ थराला ७ हजार व ४ थराला ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. अजित पवार गट संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी व देवरुख शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भरघोस बक्षिसांची मालिका असलेली दहीहंडी बांधली जाणार आहे. आ. शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनात हा सोहळा रंगणार आहे. दहीहंडी उत्सवात देवरुख एस. टी. आगार, गवळी समाज, साडवली सह्याद्रीनगर मित्रमंडळ यांच्याही दहिहंड्या उभारल्या जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow