ST Strike : गुहागर, खेड, दापोली आगारात एसटीचा कडकडीत बंद

Sep 4, 2024 - 10:24
Sep 4, 2024 - 11:24
 0
ST Strike : गुहागर, खेड, दापोली आगारात एसटीचा कडकडीत बंद

त्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. ३) राज्यभरात धरणे आंदोलन केले.

रत्नागिरी विभागात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दापोली, गुहागर, खेड आगारात कडकडीत बंद होता, तर अन्य आगारांत मात्र संमिश्र प्रतिसाद असल्याने ४० टक्के वाहतूकच बंद राहिली. यामुळे प्रवासांचे हाल झाले.

राज्य परिवहन महामंडळाच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी 'महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती' स्थापन केली आहे. एसटीच्या सर्व कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. राज्यभरात बैठकांचे सत्र थांबवून आंदोलन करण्याचा निर्धार कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आल्याने मंगळवारी (दि. ३) चालक-वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. गुहागर, खेड, दापोली आगारांतील कर्मचारी १०० टक्के संपात सहभागी झाल्याने तेथील एसटी फेऱ्या ठप्प झाल्या आहेत.

देवरुख, लांजा, राजापूर आगारांत ९० टक्के, रत्नागिरी आगारात ९५ टक्के, चिपळूण आगारात ८० टक्के, तर मंडणगड आगारात ६० टक्के कामकाज सुरू होते. जे कर्मचारी कामावर हजर झाले, त्यांना संघटनेच्या पदधिकाऱ्यांनी मज्जाव केला नव्हता. त्यामुळे कामकाज बऱ्यापैकी सुरू होते. गणेशोत्सव तोंडावर असल्याने कामकाजावर परिणाम होईल, अशी शक्यता होती, परंतु बऱ्यापैकी उपस्थिती असल्यामुळे एसटीच्या फेऱ्या सुरू होत्या.

दैनंदिन ७५० बसद्वारे ४५०० फेऱ्यांद्वारे दररोज दोन ते अडीच लाख किलोमीटर प्रवासी वाहतूक करण्यात येते. एसटी कर्मचारी संपामुळे १८०० फेऱ्यांची ४० हजार किलोमीटरची वाहतूक बंद राहिल्याने १६ लाखांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow