मंडणगड : आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्ग अद्याप रखडलेलाच

Jul 19, 2024 - 14:34
 0
मंडणगड : आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्ग अद्याप रखडलेलाच

मंडणगड :  संसद आदर्श ग्रामयोजनेच्या माध्यमातून तालुक्याला मंजूर झालेल्या आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी सात वर्षांहून अधिक काळ रखडल्याने मंडणगडवासीयांची निराशा झाली आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे हा मार्ग पूर्ण होण्यासाठी एक तप प्रतीक्षा करावी लागू नये, अशी अपेक्षा तालुकावासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

खेड-म्हाप्रळ व बाणकोट-पंढरपूर या दोन राज्यमार्गाचा कागदावरील महामार्ग हा नमूद अंतरातील दर्जा बदलून नव्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात आली. रस्ते विकासासंदर्भातील केंद्र शासनाचे धोरण लक्षात घेता नव्याने येऊ घातलेला व तालुक्यातील एकमेव राष्ट्रीय महामार्ग तालुक्याचे विकासाची वाट प्रशस्त करणार असल्याचे स्वप्न दाखवले गेले. काहीअंशी हे खरे असले तरीही घोषणा व मान्यतेच्या सात वर्षानंतरही जागेवरील वास्तव अतिशय वेदनादायी आहे. निधीची अडचण नसतानाही केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण व महसूल विभागाने अंमलबजावणीत केलेल्या चुकांमुळे यंत्रणेचे अपयश डोळ्यात भरत आहे. नवा रस्ता निकषात बसत असतानाही जमीन अधिग्रहणाचा मुद्दा महसूल विभागाने गौण ठरवला आहे. एकापेक्षा अधिक ठेकेदारांची नियुक्ती केल्यामुळे बांधकामाच्या पहिल्या दिवसांपासून अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

या सगळ्याचा परिणाम म्हणून रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही. हा महामार्ग तालुकावासियासाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. दरवर्षी पावसाळा आला की प्राधिकरणाचे अधिकार व ठेकेदार कुठल्याही परिस्थिती रस्त्याचा संपर्क तुटू न देण्याचे आश्वासन देतात; मात्र तालुकावासीयांचा त्रास काही कमी येत नाही. गतवर्षी चिंचाळी ते शिरगाव व मंडणगड ते पाले या हद्दीत रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणावर हातात घेण्यात आले. त्यामुळे धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. दुचाकी व तीनचाकी वाहनांचे शेकडो अपघात महामार्गावर होत आहेत. त्यातील बहुतांश अपघाताची विमा कंपनीकडून नुकसान मिळावे, याकरिताही नोद झालेली नाही. यंदाच्या पावसात तुळशीघाटात दररोज दरडी कोसळत आहेत. रस्त्यावरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. कर भरत असतानाही हा खेळ सुरू असल्यामुळे जुना सता बरा, म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

नैसर्गिक परिस्थितीकडे दुर्लक्ष
आगामी काळात शहर व भिंगळोली परिसरातील रस्त्याचे काम अडचणीशिवाय यंत्रणा कसे पूर्ण करणार, याची चिंताही नागरिकांना आहे. येथील तहसीलदारांची सर्व ताकद तुळशी घाटातील दरड साफ करण्यात खर्च होत आहे. येथील नैसर्गिक परिस्थिती लक्षात न घेता केलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम विविध समस्यांचे कारण ठरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow