रघुवीर घाटात संरक्षक भिंतीची गरज

Jul 22, 2024 - 11:21
Jul 22, 2024 - 12:38
 0
रघुवीर घाटात संरक्षक भिंतीची गरज

खेड : रत्नागिरी व सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खोपी येथील रघुवीर घाटात अनेक धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे व भिंती उभारण्याची तातडीची गरज असल्याची माहिती खोपी सरपंच यशवंत भोसले यांनी दिली आहे.

रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग खोपी गावातून जातो. या मार्गावर सह्याद्रीच्या रांगात रघुवीर घाट बांधण्यात आला आहे. या घाटाची सुरवात खोपी गावातून होते. गेल्या काही वर्षात हा घाट वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध झाला आहे. पावसाळ्यात धबधबे प्रवाहित झाल्यानंतर येथे हजारो पर्यटक खासगी वाहनांनी पर्यटनाकरिता येत असतात; मात्र घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे दोन महिने पर्यटन बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर येते. यासाठी रघुवीर घाट वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याची मागणी खोपी ग्रामस्थांनी केली आहे. 

खोपीचे उपसरपंच शंकर खरावते, अंकुश भोसले, विकी भोसले, संजय आखाडे व राजेंद्र भोसले यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, रघुवीर घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे, पाण्याचा विसर्ग होण्यासाठी मोऱ्या व गटारांची कामे होणे आवश्यक आहे. सद्य स्थितीत घाटात अनेक भागात पावसाचे व झऱ्यांचे पाणी रस्त्यावर साठत असल्यामुळे रस्ता निसरडा व वाहतुकीसाठी धोकादायक होतो यासाठी गटारे व मोऱ्या होण्याची गरज असून, यामुळे घाट वाहतुकीस सुरक्षित होईल. नादुरुस्त झालेल्या मोऱ्या, संरक्षक भिंती व कठडे तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी वळवण, उचाट, बामणोली अशा चीर घाटात खांदाट खोऱ्यातील २० गावांतील जनतेचा दळणवळणाच्यादृष्टीने रघुवीर घाट एकमेव मार्ग आहे. नियमित व अत्यावश्यक गरजासाठी खांदाट खोऱ्यातील वीस गावातील ग्रामस्थ या मार्गाचा वापर करतात; मात्र या घाटात दरडी कोसळत असल्याने हा मार्ग पावसाळ्यात बंद होतो. या घाटरस्त्यात चार ते पाच ठिकाणच्या संरक्षक भिंती ढासळल्या आहेत. तसेच काही ठिकाणी संरक्षक भिंतीच नाहीत. त्यामुळे वयोवृद्ध, रुग्ण, गरोदर स्त्रिया, शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन मार्गावर प्रवास करावा लागत आहे

प्रशासनाकडून दुर्लक्ष
वारंवार सूचना व लेखी स्वरूपात कळवूनदेखील प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन प्रशासनाने रघुवीर घाटाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंती उभारणे आवश्यक असल्याचे मत खोपीच्या ग्रामस्थांनी व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow