रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आयोजित रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौर ऊर्जा चर्चासत्र उत्साहात संपन्न

Jul 22, 2024 - 12:18
Jul 22, 2024 - 12:24
 0
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आयोजित रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौर ऊर्जा चर्चासत्र उत्साहात संपन्न

रत्नागिरी : रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन तर्फे आयोजित रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौर ऊर्जा या विषयावर एक दिवशीय चर्चा सत्र शिर्के हायस्कूलच्या रंजन सभागृहात उत्साहात संपन्न झाले. रत्नागिरीतील ७० प्रबुद्ध नागरिक या चर्चा सत्राला मुसळधार पाऊस सुरु असतानाही पूर्णवेळ उपस्थित होते. 

सुरवातीला इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षा डॉ स्वप्ना संदीप  करे  यांनी  प्रमुख वक्ते श्री विद्याधर शेडगे आणि सौ दीपिका ओमकार भाटकर यांनी श्री हृषीकेश कोंडेकर यांची उपस्थिताना ओळख करून दिली.  मा. अध्यक्ष हिराकांत साळवी यांचे हस्ते  शाल, श्रीफळ आणि रोपटे देवून प्रमुख वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.  

चर्चा सत्राची सुरुवात रोटरी क्लबचे खजिनदार डॉ. वैभव कानडे यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापक श्री.राजेंद्र (दादा) कदम यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणाने जनसमुदायाला अभिमुख करुन चांगल्या भविष्यासाठी पर्यावरण पूरक शाश्वत विकासाचे महत्त्व पटवून दिले.

पहिल्या व्याख्यानात श्री. विद्याधर शेडगे यांनी कोकणात एवढा पाऊस पडत असताना सुद्धा उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते त्यामुळेच पावसाळ्यात पडणारे पाणी कसे अडवता येईल, प्रत्येक गृह निर्माण सोसायटी आणि खाजगी बोअरवेल मध्ये पावसाचे पाणी वैशिष्ठ्य पूर्ण योजना करून सोडल्यास वर्षभर सर्वाना पुरेल एवढे पाणी उपलब्ध करता येईल याचे उदाहरणसह स्पष्ट केले. शंका-समाधान कार्यक्रमात श्री. नारायण आजगावकर, श्री. भैय्या वणजू, श्री. सतीश खोत, श्रीमती पूजा कोळेकर यांनी प्रश्न विचारले. शहरात खूप ठिकाणी लोक विहिरी सुद्धा वापरतात, विहिरी पहिल्या पावसातच तुडुंब भरून वाहतात अशा वेळी विहिरीचे पुनर्भरण कसे करावे या विषयी प्रश्न विचारले. कोकणातील वैशिष्ठपूर्ण माती आणि कातळयुक्त जमिनीत पावसाचे पाणी पुनर्भरण करायचे असल्यास या विषयावर अधिक संशोधनाची आवश्यकता डॉ केतन चौधरी यांनी विषद केली.  

दुसरे व्याख्यान श्री हृषीकेश कोंडेकर यांनी दिले. सौर उर्जेत भारत देश करीत असलेली जलद प्रगती आणि विविध शासकीय योजनाची माहिती त्यांनी दिली. भारतात २०३० पर्यत ५०० गिगा वॉट एवढे प्रचंड सौर उर्जेचे उत्पादन घेण्याचे उदिष्ठ ठेवण्यात आलेले असून २०२४ मध्ये सुमारे ८७ गिगा वॉट सौर विजेचे उत्पादन करण्यात येत आहे. घरावरील छतावर सौर पॅनल बसवून कोकणात सुमारे ८ ते १० महिने पर्यत सौर ऊर्जा सौरवीज मध्ये रुपांतरीत करता येईल त्यामुळे वीजबिल मध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते हे सोदाहरण स्पष्ट केले. त्यानंतर श्री कोंडेकर यांनी कृषी सौर पंप, रस्त्यावरील दिवे, परसबागेतील सौरदिवे याविषयी माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत श्री. नारायण आजगावकर, रोटेरीयन श्री केतन सावंत, सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष श्री.प्रशांत पाटील, क्रेडाई संघटनेचे सदस्य श्री कट्टे यांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळाच्या छतावर सौर पॅनल बसवून  सौर वीज तयार केल्यास शाळेचे वीजबिल मोठ्या प्रमाणावर कमी करता येईल तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचे कौशल्य प्रशिक्षण देवून रोजगार निर्मिती करता येईल यावर चर्चा झाली. 

अध्यक्षीय मार्गदर्शनात इंजिनियर श्री हिराकांत साळवी  यांनी कोकणात शाश्वत विकास रुजवायचा असेल तर जल संवर्धन आणि सौर ऊर्जा निर्मिती हे महत्वाचे घटक असतील आणि सर्व नागरिकांनी स्वयंप्रेरणेने या दोन्ही बाबींचा स्वीकार केल्यास पर्यावरण पूरक जीवनशैलीत  मोठी सुधारणा होईल. भविष्यातील पिढ्यांसाठी अखंड ऊर्जा स्त्रोत आणि उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी आपल्याला समाज म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले. आजचे हे चर्चासत्र म्हणजे केवळ माहितीचा प्रसार नसून नवीन तंत्रज्ञान स्वीकृतीसाठी  एका चळवळीची सुरुवात आहे, जिथे पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आणि सूर्यप्रकाशाच्या प्रत्येक किरणाचा सुयोग्य वापर केला जाईल. रोटरी परिवार अशा सर्व प्रयत्नाकरिता पाठींबा आणि मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. 

चर्चासत्र कार्यक्रम  यशस्वी होण्यासाठी केदार माणगावकर, दिगंबर मगदूम, सीताराम सावंत, सुवर्णा चौधरी, डॉ.स्वप्ना करे, आणि दीपिका भाटकर यांचे सहकार्य व परिश्रम मोलाचे ठरले.

सहाय्यक प्रांतपाल ऍड. शाल्मली अंबुलकर, माजी अध्यक्ष बिपीनचंद्र गांधी, वामन सावंत, ऍड. विनय अंबुलकर, संतोष सावंतदेसाई, रोटरी क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. रूपेश पेडणेकर, निलेश मुळ्ये, इंटरक्ट क्लब ऑफ नवनिर्माण हायस्कूलचे विधार्थी आणि पालक  यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ केतन चौधरी आणि आभार प्रदर्शन डॉ संदीप करे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या आगामी कार्यक्रम आणि उपक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया डॉ. संदीप करे, सेक्रेटरी, rotary.sandeepkare@gmail.com किंवा 9225803745 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow