संगमेश्वर : तुरळ येथील शाळा नं. २ मध्ये खोलीत गळती

Jul 22, 2024 - 10:34
Jul 22, 2024 - 15:38
 0
संगमेश्वर : तुरळ येथील शाळा नं. २ मध्ये  खोलीत गळती

संगमेश्वर : संगमेश्वरनजीकच्या तुरळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. २ या शाळेच्या खोलीत सतत सुरू असलेल्या पावसामुळे पाणीच पाणी साचले असून, मुलांना बसण्यास जागा नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. दहा वर्षांपासून शाळेची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, खोल्या दुरुस्तीचा प्रस्तावदेखील धूळखात पडून आहे.

शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर भर दिला असल्याने यावर जिल्ह्यात शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करत आहे. यामध्ये शाळाखोल्यांची दुरुस्ती, संरक्षक भिंती, नवीन इमारत, स्वच्छतागृह यांसह अनेक प्रकारची कामे शासन ठेकेदाराकरवी पूर्ण करून घेतात; मात्र या सर्व प्रक्रियेतून तुरळ येथील 'जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. २' ही वंचित राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या शाळेची स्थापना १९४७ ला करण्यात आली; परंतु गेल्या दहा वर्षांपासून शाळेची दुरुस्ती न झाल्याची धक्कादायक बाबदेखील या निमित्ताने उघड झाली आहे. या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरत आहेत. अक्षरशः विद्यार्थ्यांना बेचवर बसून पाण्यात पाय ठेवून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारतीच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या सर्व प्रकारातून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे सरकारच्यावतीने विकासाच्या गप्पा मारल्या जातात; पण दुसरीकडे मात्र हे भीषण वास्तव सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. प्रगतीपथावर रत्नागिरी जिल्हा माझा, असं म्हणत लोकप्रतिनिधी चर्चा करत असतात; पण, याच महाराष्ट्राचं भविष्य असणारी पुढची पिढी सध्या ज्या अवस्थेत शिक्षणाचे धडे गिरवतेय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow