Breaking : रत्नागिरी - साताऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाचा रस्ता दरीत कोसळला

Jul 24, 2024 - 10:39
 0
Breaking : रत्नागिरी - साताऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाचा रस्ता दरीत कोसळला

रत्नागिरी : सध्या कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस(Rain) सुरु आहे. दरम्यान रस्त्याच्या आणि घाटाच्या नागमोडी छोट्या रस्त्यांवर दूर्घटना घडत असल्याच्या घटना समोर येत असताना आता रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठे भागदाड पडले आहे.

रस्त्याचा एक भाग हजारो फूट खोल दरीत कोसळला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलीकडील तब्बल ४० गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. रघुवीर घाट हे प्रमुख पर्यटन क्षेत्र आहे. दररोज शेकडो पर्यटक या घाटामध्ये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जातात, त्याच पार्श्वभूमीवर ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा घाट बंद करावा, अशी मागणी खोपी गावातील ग्रामस्थांनी केली असून तसे निवेदनही तहसील कार्यालयात दिले आहे.

रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्याला जोडणारा खेड अकल्पे मार्गावरील रघुवीर घाट हा प्रमुख राज्य मार्गावरील घाट आहे. कोयना अभयारण्यामध्ये व कोयना बॅक वॉटर परिसरात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि माढा तालुक्यात समाविष्ट असलेल्या शिंदी, वळवण, चाट, वाधावळे, लामज मोरनी, आरव, अकल्पे, तापोळा, याप्रमाणे लहान मोठी अशी ४० गाव घाटाच्या पलीकडे आहेत. त्यांचे दळणवळणाचे साधन हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण हेच आहे.

40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती

रघुवीर घाटमार्गे रत्नागिरी जिल्ह्यातील या दोन तालुक्यात येऊन या गावांमधील लोक आपले जनजीवन सुरू ठेवतात. ही गावे जरी सातारा जिल्ह्यात असली, तरीदेखील त्यांचा रस्त्यामार्गे संपर्क हा फक्त रघुवीर घाटमार्गे रत्नागिरी जिल्ह्याशीच होतो. याच रघुवीर घाटात हे दुर्घटना घडल्यामुळे या चाळीसगाव यांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी रघुवीर घाट हे एक पर्यटन क्षेत्र आहे. दररोज शेकडो लोक त्या ठिकाणी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जातात, तर वीकेंडला व सुट्टीच्या दिवशी पावसाळ्यामध्ये या घाटात हजारो लोक आपल्या कुटुंबियांसह व मित्र- मैत्रिणीसह उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी व कोयना अभयारण्य पाहाण्यासाठी त्या ठिकाणी गदी करतात. त्यांच मार्गावर रस्त्याला भगदाड पडल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका बाजूला उंचा डोंगर तर दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल दरी अशी भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी असून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

घाटातील वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी

रघुवीर घाटात रस्त्याला भगदाड पडल्यामुळे सुरक्षिततेचा विचार करून या मार्गावरील वाहतूक व पर्यटन तत्काळ बंद करावे, तसेच तत्काळ त्या ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरुवात करावी, अशी मागणी खोपी गावचे सरपंच यशवंत भोसले, तसेच संजय आखाडे यांनी खेड तहसिलदार कार्यालयात दिलेल्या निवेदनात केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow