सत्तर टक्के गुण देण्यासारखा अर्थसंकल्प : प्रा. उदय बोडस

Jul 24, 2024 - 11:37
 0
सत्तर टक्के गुण देण्यासारखा अर्थसंकल्प : प्रा. उदय बोडस

रत्नागिरी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी सादर केलेला अर्थसंकल्प मर्यादांच्या चौकटीत आणि कमी लोकप्रिय घोषणांचा अर्थसंकल्प आहे. त्याला ७० टक्के गुण देता येतील, अशी प्रतिक्रिया येथील अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. उदय बोडस यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, अंतरिम अर्थसंकल्पात दाखवलेला आत्मविश्वास, लोकसभेतील निसटत्या बहुमतामुळे मर्यादांच्या चौकटीत अडकल्यामुळे, कमी लोकप्रिय घोषणांवर भर देणारा अर्थसंकल्प आज सादर झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विक्रमी सातव्या अर्थसंकल्पात सर्वांना थोडे थोडे खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरदारवर्गाला नवीन करप्रणालीत प्रमाणित वजावटीची दिलेली सूट, नवीन करप्रणालीत दिलेली सरसकट १७ हजार ५०० रुपयांची करसवलत आणि बिहार, आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांना दिलेले ४१ हजार कोटींचे झुकते माप लक्षात घेऊनही ह्या अर्थसंकल्पाला ७० गुण देता येतील.

अर्थसंकल्पातील स्वागतार्ह गोष्टी अशा की, कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटीं तरतूद, लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी प्रमाणित कार्यपद्धती, उद्योगक्षेत्राला आवश्यक अभ्यासक्रम तयार करणार, पूर्वोत्तर राज्यांसाठी पूर्वोदय योजना, ३० लाख नवीन रोजगार निर्मिती व महिलांचा सहभाग वाढवणार, १ कोटी युवकांना इंटर्नशिप, मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट, महिलांनी खरेदी केलेल्या मालमत्तेवर सवलत, जहाज उद्योगाचा विकास करणार, वस्तू आणि सेवाकरांबाबत ६ महिन्यांत नवीन सुसूत्रता, कॅन्सरवरील औषधांच्या सीमा शुल्कात सूट, मोबाइल फोन स्वस्त, आयकर १९६१ कायद्याचे पुनर्विलोकन, ईकॉमर्स व्यवहारावर स्रोतातून कर कपात कमी, भांडवली करांची २५ टक्क्यांनी वाढविली, नवीन पेन्शन योजनेत योगदानात वाढ, नोकरदाराची आणि निवृत्तीवेतनधारकांची प्रमाणित सूट ५० टक्क्यांनी वाढविली.

राज्यांना मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढवल्याने राज्ये दिवाळखोर होतील. वित्तीय तीट ४.९ टक्क्यांपेक्षा कमी झालेली नाही. सोने व चांदीची आयात स्वस्त होणार, पेट्रोलियम पदार्थांना वस्तू आणि सेवाकारांच्या कक्षेत न आणणे, शेअर गुंतवणुकीला प्रोत्साहन नाही, जुनी करप्रणाली स्वीकारणाऱ्यांना कोणतीच सवलत नाही. विदेशी कंपन्यांना करसवलत आणि जादा फायदा होणार आहे, या अर्थसंकल्पातील त्रुटी आहेत, असेही प्रा. बोडस यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow