चिपळुणात ग्रॅव्हिटीने पाणी योजनेला मंजुरी

Jul 26, 2024 - 11:59
Jul 26, 2024 - 12:06
 0
चिपळुणात ग्रॅव्हिटीने पाणी योजनेला मंजुरी

चिपळूण : गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेली चिपळूण न.प च्या ग्रॅव्हिटीने नळपाणी योजनेला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात १६० कोटींच्या या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली होती. आता आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने या योजनेला प्रशासकीय मान्यत्ता मिळाली असून, १५५ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीला शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता चिपळूणवासीयांचा वर्षभरासाठी पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

सद्यस्थितीत चिपळूण नगरपरिषद वाशिष्ठीचे पाणी उचलते. शहरातील गोवळकोट आणि खेर्डी येथे जॅकवेलच्या माध्यमातून हे पाणी उचलण्यात येते आणि नागरिकांना वितरित होत असते. मात्र, हिवाळ्याच्या दिवसात कोयना वीज प्रकल्पातून अत्यंत कमी वीजनिर्मिती होते. अशावेळी कोयनेतून येणारे अवजल थांबते आणि वाशिष्ठी नदीपात्रात समुद्राचे खारे पाणी शिरते आणि हे खारे पाणी पेठमाप येथील जॅकवेलमध्ये जाऊन नळावाटे घरामध्ये येते. याशिवाय कोयनेचे अवजल हिवाळ्यात न आल्याने पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. तसेच दूषीत पाण्याची समस्यादेखील उद्भवते. या पार्श्वभूमीवर अनेक वर्षे ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी प्रयत्न सुरू होते.  

आ. शेखर निकम यांच्या कार्यकाळात या योजनेला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. राज्याच्या प्रधान सचिवांनी मंत्रालयात दि. २७ जुलै रोजी ही मंजुरी दिली. या बद्दल आ. शेखर निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, मुख्याधिकारी विशाल भोसले, आजी- माजी नगरसेवक यांना धन्यवाद दिले आहेत. यावेळी आ. निकम यांच्यासमवेत राजू जाधव, सचिन साडविलकर, जाफर कटमाले, सचिन पाटेकर, विलास बाजे, प्रभाकर सैतवडेकर, राकेश जाधव, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow