चिपळूण : कळंबस्तेत होणार उड्डाण पूल

Jul 26, 2024 - 13:57
Jul 26, 2024 - 14:01
 0
चिपळूण : कळंबस्तेत होणार उड्डाण पूल

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण-कळंबस्ते फाटकावर उड्डाण पूल बांधणीला प्रशासकीय मान्यता सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही मान्यता मिळाली आहे, अशी माहिती भाजप चिपळूण तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी दिली आहे.

कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून चिपळूण येथील कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. या फाटकामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरुवातीला ठरावीक वेळी रेल्वे सुरू होत्या. परंतु, आता कोकण रेल्वे मार्गावर अनेक रेल्वे गाड्या चालू असल्याने वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. फाटक बंद केल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागतात. 

यामुळे रुग्णांचीही गैरसोय होते. या रस्त्याला लोटे, चिरणी, आंबडस मार्ग जोडले गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रेल्वे फाटकावरती उड्डाणपूल व्हावे, यासाठी स्थानिक ग्रामस्थ व वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकारी यांनी अनेक वेळा प्रशासनाला, आमदार, खासदारांना निवेदने दिली आहेत. या अनुषंगाने भाजपा नेते माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी या विषयात लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले. यानुसार नुकतीच मुंबई मंत्रालयात बैठक झाली.

या बैठकीत चिपळूण - कळंबस्ते रेल्वे फाटकावरती उड्डाणपूल बांधणीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, खेड तालुकाध्यक्ष किशोर आंग्रे, ऋषिकेश मोरे, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद चाळके, जिल्हा चिटणीस विनोद भुरण, सहकार सेल जिल्हा संयोजक रत्नदीप देवळेकर, शिक्षक संघटनेचे अमोल भोबस्कर, उद्योग आघाडीचे जगदीश आंब्रे, तालुका उपाध्यक्ष शरद तेवरे तसेच कोकण रेल्वे अधिकारी, सा.बां. विभाग अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow