चिपळुणातील शब्दशिल्प हटवले

Jul 29, 2024 - 10:10
Jul 29, 2024 - 17:13
 0
चिपळुणातील शब्दशिल्प हटवले

चिपळूण : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या १५ ऑगस्टला या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व तयारी सुरू असताना पुतळ्यासमोरच असलेले ३२ वर्षांपूर्वीचे कवी माधव यांचे शब्दशिल्प हटवण्यात आले आहे. लवकरच ते शहरातील मार्कडी येथील स्वामी मठासमोरील चौकात प्रस्थापित केले जाणार आहे. 

चिपळूण शहरातील वेस मारुती मंदिर हे पूर्वी नगराचे प्रवेशद्वार ओळखले जायचे, या प्रवेशद्वारातून शहरात येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी १९९२ मध्ये कवी माधव यांच्या सह्याद्रीच्या तळी शोभती हिरवे तळ कोकण, या कवितेचे शब्द शिल्प उभारण्यात आले.

कवी माधव यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने येथील साहित्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी एकत्र हा प्रयत्न केला. माजी आमदार (कै.) निशिकांत उर्फ नाना जोशी, साहित्यिक प्रकाश देशपांडे, दादा फडके आदी मंडळींनी या कामी पुढाकार घेतला होता. शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची सहजपणे नजर पडेल, अशा पद्धतीने या शब्दशिल्पाची रचना केली होती. सुरवातीला मार्बल स्वरूपात शब्दशिल्प उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता; मात्र सह्याद्रीच्या कडेकपारीत असलेला शब्दशिल्प शिलालेखातच असायला हवा, असा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे खेड तालुक्यातील पंधरागाव विभागातील धामणंद येथून भव्य स्वरूपातील शिलालेख बनवून आणण्यात आला.

या विषयी साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी माहिती देताना सांगितले की, कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे साहित्य कवी माधव यांच्या जन्म शताब्दीनिमित्ताने १९९२ मध्ये युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पटांगणात मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर या संमेलनाचे नियोजन केले होते. अनेक नामवंत साहित्यिक या संमेलनात सहभागी झाले होते. याचवेळी पुणे महानगर पालिकेत अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अश्रफ दलवाई यांच्या हस्ते शब्दशिल्पाचे अनावरण केले होते. या शब्दशिल्पामुळे चिपळूणची एक नवी ओळख निर्माण झाली होती. ती यापुढेही कायम जपायला हवी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:38 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow