चिपळूण पंचायत समितीची नवी इमारत सहा मजली

Jul 31, 2024 - 14:42
 0
चिपळूण पंचायत समितीची नवी इमारत सहा मजली

चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून चिपळूण पंचायत समितीच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. अखेर बहादूरशेखनाका येथील सभापती निवासस्थानच्या जागेत पंचायत समितीची नवीन इमारत बीओटी तत्त्वावर उभारण्याचे नियोजन आहे. सुमारे सहा कोटी खर्चाची सहामजली इमारत उभारण्यात येणार असून, पंचायत समितीचे सर्व विभाग एकाच छताखाली येणार आहेत. याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठवला आहे. मंगळवारी आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असता चिपळूण पंचायत समितीची नवीन इमारत तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

येथील पंचायत समितीची इमारत जीर्ण झाली असून, पंचायत समितीचे काही विभाग इतरत्र भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या पंचायत समितीच्या ठिकाणीच नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव होता. गेल्या २० वर्षाच्या कालावधीत अनेक सभापती आणि लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीच्या नव्या इमारतीची घोषणा केली. अनेकदा मंत्रालय स्तरावर
पाठ्पुरावा केला तरी त्याला यश आले नाही. निधीअभावी इमारतीची समस्या निर्माण झाली होती. बहादूरशेखनाका येथे जिल्हा परिषदेची जागा असून तेथे सभापती निवासस्थान आहे.

हे सभापती निवासस्थान मोडकळीस आले असून, तेथे अनेक वर्षापासून वास्तव्य नाही. तेथील जागाही मोठी असून जाणे-येणे नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. त्यामुळे याच जागेत पंचायत समितीची नवी इमारत उभारण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे. यासाठी आमदार शेखर निकम सातत्याने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. बहादूरशेखनाका येथील जागेत सहामजली इमारत उभारण्यात येणार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित्त करा, या धर्तीवर ही इमारत उभारण्याचे नियोजन आहे. या नव्या इमारतीचा खर्च जवळपास ६ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एकाच छताखाली पंचायत समितीचे सर्व विभाग आणले जाणार आहेत. त्यामुळे नव्या इमारतीत पंचायत समितीबाहेर असलेल्या महिला बालकल्याण, आरोग्य आणि बचत गट विभागाला हक्काची जागा मिळणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेली पंचायत समितीची इमारत ९९ वर्षाच्या कराराने बांधकाम करणाऱ्या कंपनीला, बांधकाम व्यावसायिकाला देण्याचे नियोजन आहे. येथून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे. बीओटी तत्त्वावर ही इमारत उभारण्यात येणार असल्याने त्यास लवकरच मान्यता मिळेल, अशी शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री सामंत यांच्याशी चर्चा करताना आमदार निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, आदी उपस्थित होते.

चिपळूण पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रखडला आहे. सध्या बीओटी तत्त्वावर इ‌मारत उभारण्याचे नियोजन आहे. त्यास शासनाची मान्यता मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री उदय सामंत याची भेट घेऊन या प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा केली. या दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या इमारतीला लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. - शेखर निकम, आमदार, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow