मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुर्दैवी : प्रकाश आंबेडकर

Jul 31, 2024 - 14:45
 0
मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुर्दैवी : प्रकाश आंबेडकर

मुंबई : राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मांडलेली भूमिका दुर्दैवी असल्याचं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत की विरोधात, हे त्यांनी स्पष्ट केलं नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आरक्षणाच्या संदर्भातली शिवसेनेची भूमिका दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं याबाबतीत मांडलेली भूमिका दुर्दैवी आहे. आरक्षण मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात? हे मांडण्याऐवजी त्यांनी असे म्हटले आहे की, मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. ते आरक्षण वाढवले की, मराठा समाजाला न्याय मिळेल."

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील घटकपक्षांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं होतं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचित आघाडी एकला चलो रेचा नारा देण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय?

मातोश्री या निवासस्थानाबाहेर काही मराठा आंदोलकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर येत उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर केली. "आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्याला नाही, तो अधिकार लोकसभेला आहे. त्यामुळे सर्व समाजातील लोकांनी दिल्लीत चला, मोदींना लक्ष घालायला सांगा, ते देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल," असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारकडे टोलवला आहे. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी यावर भूमिका मांडली. तत्पूर्वी मराठा समाजातील आंदोलकांचीही ठाकरेंनी भेट घेतली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाही. जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने रद्द केलं. लोकसभेत हा प्रश्न सुटू शकतं. मी माझे खासदार सोबत द्यायला तयार आहे. सर्वांनी मग त्यात मराठा, धनगर आणि इतरांनी मोदींकडे जावं. कारण मोदी सातत्याने ते मागास समाजातून येतात असं सांगतात. गरिबीतील संघर्ष त्यांनी अनुभवला आहे त्यामुळे आरक्षणाबाबत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. ओबीसींच्या मर्यादा वाढवायच्या आहेत. धनगरांना आरक्षण देताना आदिवासी आरक्षणाच्या मर्यादा वाढवायच्यात, कुणाला दुखवायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी सांगायला हवं. आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत काही तोडगा काढायचा असेल तर आमचा पक्ष त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे असं त्यांनी म्हटलं.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 31-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow